मुंबई (Pclive7.com):- कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या २१ दिवसांचा लॉकडाऊन १४ एप्रिलला संपत आहे. हा लॉकडाऊन उठवला जाणार की वाढवला जाणार याबद्दल सर्वसामान्यांमध्ये संभ्रम आहे. कोरोनाची परिस्थिती अद्यापही नियंत्रणात न आल्याने हा लॉकडाऊन वाढवला जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती मिळत असून ३० एप्रिलपर्यंत निर्बंध लागू राहतील अशी शक्यता आहे.
देशात लॉकडाऊन जाहीर होण्याआधीच राज्यात उद्धव ठाकरे यांनी संचारबंदी जाहीर केली होती. मात्र राज्यातील कोरोनाची परिस्थिती अद्यापही नियंत्रणात नाही. देशात सर्वात जास्त करोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात शनिवारी कोरोनाचे ९२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १६६६ वर पोहचला आहे. यासंदर्भातील माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
अनेक राज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे लॉकडाऊन वाढवला जावा अशी मागणी केली आहे. ओडिशा राज्याने एप्रिल अखेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करुन टाकला आहे. तसंच पंजाब सरकारनेही लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबमध्ये १ मेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले होते. पंजाबमध्ये Covid-19 ची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. पंजाबमध्ये १०० पेक्षा जास्त नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये, यासाठी खबरदारी म्हणून लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.






















Join Our Whatsapp Group