पिंपरी (Pclive7.com):- संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट ओढावले आहे. गेल्या एक महिन्यापासून लॉकडाऊन सुरू आहे. उद्योगधंदे, रोजगार बंद आहेत. त्यामुळे कामगार वर्गासह सर्वसामान्य नागरिकांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे राज्य सरकारने याची दखल घेत २०० युनिट पर्यंतचे सरसकट नागरिकांची वीजबिल माफ करावीत अशी आग्रही स्वीकृत नगरसेवक कुणाल लांडगे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे स्वीकृत नगरसेवक कुणाल लांडगे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण देशामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून सरकारने गेल्या महिन्यापासून लॉकडाऊन जाहीर केला आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्येसुध्दा त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे. राज्य शासनामार्फत तसेच स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत देखील विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील नागरिकांचे, हातावरचे पोट असणाऱ्या कामगारांचे, सर्वसामान्य नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. लोकडाऊममुळे व्यवसाय, धंदा, नोकरी बंद आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांवर आर्थिक संकटाचा डोंगर देखील कोसळला आहे. म्हणूनच महाराष्ट्रातील नागरिकांचे २०० युनिट पर्यंतचे सरसकट वीजबिल माफ करण्यात यावे अशी मागणी स्वीकृत नगरसेवक कुणाल लांडगे यांनी केली आहे.






















Join Our Whatsapp Group