पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाच्या संकटामुळे महाराष्ट्राची थोर परंपरा असलेला आषाढी वारी सोहळा यावर्षी रंगणार का? हा प्रश्न संपूर्ण वारकरी संप्रदाय आणि मराठी जनांना पडला आहे. मात्र या परंपरेत कुठलाही खंड पडू न देता सुवर्णमध्य काढून श्री संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींचा पालखी सोहळा मोजक्याच किंवा दहा ते बारा वारकऱ्यांच्या उपस्थितीत पंढरपूरकडे प्रस्थान ठेवण्याची शक्यता आहे.
पालखी सोहळा प्रमुखांची श्री.क्षेत्र आळंदी येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. कोरोनाचे सावट आहे, तसेच वारीची परंपरा या दोन्ही गोष्टींना छेद न देता शासनाशी चर्चा करून समन्वयाने मार्ग काढण्याचे एकमताने ठरले असल्याची माहिती वारकरी फडकरी आणि दिंडी समाज संघटनेचे अध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी दिली.
आषाढीवारी संदर्भात ३ मे रोजी लॉकडाऊन संपल्यानंतर महाराज मंडळींची बैठक होणार होती. मात्र लॉकडाऊन १७ मे पर्यंत वाढवल्याने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक पार पडली. या बैठकीत कोरोनाचे संकट आणि वारीपरंपरा यावर महाराज मंडळींनी सविस्तरपणे आपली भूमिका मांडली. राज्य शासनाला विश्वासात घेऊन कोरोनाच्या नियमांना बाधा न येता वारीपरंपरा कशी जतन करता येईल याबाबत सुवर्णमध्य काढावा असा सूर होता. त्यासाठी प्रमुख महाराज मंडळींनी शासनाशी संपर्क करून भूमिका मांडावी लॉकडाऊन संपल्यानंतर सर्व मानाचे पालखी प्रमुख आणि महाराज मंडळी यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय जाहीर करावा असे एकमताने निश्चित करण्यात आले. या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला आळंदी देवस्थान ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त अॅड. विकास ढगे-पाटील विश्वस्त अभय टिळक, डॉक्टर अजित कुलकर्णी, लक्ष्मीकांत देशमुख, योगेश देसाई, डॉ.नरेंद्र वैद्य पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, शितोळे सरकार, चोपदार, ह.भ.प भास्कर महाराज, दिंडी संघटनेचे अध्यक्ष ह.भ.प. मारुती महाराज कोकाटे आदी उपस्थित होते.
दरम्यान, पालखी सोहळ्याला राज्य सरकार परवानगी देईल तितक्या लोकांचा परंपरेप्रमाणे समावेश केला जाणार आहे. पालखीसोबत रिंगण वगैरे परंपरागत सर्वप्रथम पाळल्या जाणार आहेत. सोशल डिस्टन्सिंग मास्क आदींबाबतचे नियम पाळले जाणार असून सोबत एक वैद्यकीय पथकही असणार आहे.






















Join Our Whatsapp Group