पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेने मोठ्या प्रमाणात थेटपध्दतीने साहित्य, वस्तू खरेदी केली आहे. तसेच अनेक सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींनी मदत देखील केली आहे. महापालिकेकडून शहरातील नागरिकांना या साहित्यांचे वितरण करण्यात येत आहे. मात्र या खरेदीत आणि वितरणात मोठा घोटाळा झाल्याचा संशय विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी व्यक्त केला आहे. नाना काटे यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून सर्व माहिती मागितली आहे.
यासंदर्भात नाना काटे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग चालू आहे. कोरोना बाधित रुग्ण शहरातील वेगवेगळ्या भागात सापडत आहेत. या अनुषंगाने पूर्ण देशभरात १७ मे पर्यंत संचारबंदी (लॉकडाऊन) लागू करण्यात आला आहे. कोरोनाच्या विरोधात मनपा युध्दपातळीवर प्रयत्न करत आहे, शहरात नागरीकांचे सर्वेक्षण करणे, बेघर, बेरोजगार नागरीकांना जेवण पुरविणे नागरीकांमध्ये कोरोना विरोधात जनजागृती करणे इत्यादी प्रयत्न करीत आहे. त्याप्रमाणे कोरोना विषाणूचा संसर्गा रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाय योजना मनपा प्रशासन करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मास्क, औषध फवारणी, सँनिटायझर, साबण अन्नधान्य इत्यादीची खरेदी थेट पध्दतीने करण्यात आलेली आहे. तसेच शहरातील सामाजिक संस्था, विविध मित्र मंडळ सोशल फाऊंडेशन, सी.एस.आर. मधूनही मनपाकडे वस्तू स्वरुपात मदत येत आहे. त्या अनुषंगाने खालील प्रमाणे माहिती देण्यात यावी.
१. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मनपाने आतापर्यंत किती मास्क विकत घेतले आहेत. ते कोणत्या दराने घेतले आहेत? कोणत्या संस्थेकडून घेतले आहेत, त्यांची नावे व पत्ते देण्यात यावेत.
२ मनपाने आतापर्यत किती सँनिटायझर विकत घेतले आहेत ? कोणाकडून व किती दराने घेतले त्या संस्थांची नावे व पत्ते देण्यात यावेत.
३. मनपाने शहरातील गरजू नागरीकांना दररोज जेवण पुरविण्यासाठी अन्नधान्य विकत घेत आहे. त्या संस्थाची नाव, पत्ते दर व किती अन्नधान्य विकत घेतले आहे व ते कसे वितरीत केले त्याची सविस्तर माहिती देण्यात यावी.
४. शहरातील विविध सामाजिक संस्था, सोशल फाऊंडेशन इत्यादी संस्थानीही मनपात मास्क, सँनिटाझर, अन्नधान्य इत्यादी वस्तू स्वरुपात शहरातील गरजूनां देण्यासाठी दिलेले आहे. त्याबाबत कोणत्या संस्थेने कोणत्या स्वरुपात किती मदत केली आहे. याची सविस्तर माहिती देण्यात यावी.
५. कोरोनाच्या विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरातील खाजगी कंपन्यांनी सी.एस.आर. (सामाजिक उत्तरदायित्व) च्या माध्यमातून कोणत्या स्वरुपाची, किती मदत केली आहे ? यांची सविस्तर माहिती देण्यात यावी. अशी मागणी नाना काटे यांनी केली आहे.























Join Our Whatsapp Group