पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. पुण्यात तर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. परंतू ‘मला २०२१ साल पहायचयं’ हेच ध्येय प्रत्येकाने ठेवायला हवे अशी भावना शिरूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज (दि.१२) पिंपरी चिंचवड महापालिकेस भेट देऊन माहिती घेतली. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. ते म्हणाले की, आज महापालिकेच्या वॉर रूमची पाहणी केली. तसेच कोरोना संदर्भात आढावा घेतला. पुण्याच्या तुलनेत पिंपरी चिंचवड शहराची परिस्थिती तशी आटोक्यात आहे. महापालिकेच्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण बरे होण्याचे प्रमाण शहरात चांगले आहे. वायसीएममधील डॉक्टर चांगल्या प्रकारेे रुग्णांचे उपचार करत आहेत. सध्या भोसरी विधानसभा मतदारसंघात रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या अनुषंगाने या विभागात प्रशासनाने अधिक लक्ष द्यावे. तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेतील काही अभियंत्यांची ऑर्डर पुण्यात काढली होती, ही रद्द करावी अशी देखील मागणी त्यांनी यावेळी आयुक्तांना केली. कोरोनाच्या बाबतीत सध्या पुणे ‘आऊट ऑफ कंट्रोल’ झाले आहे. तिथले ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण पिंपरी चिंचवड शहरात नकोत अशा देखील सूचना त्यांनी आयुक्तांना यावेळी केले आहेत.
यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी महापालिका प्रशासन तसेच पत्रकारांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप केले. यावेळी शिवसेना गटनेते राहुल कलाटे, नेत्या सुलभा उबाळे, धनंजय आल्हाट आदी उपस्थित होते.























Join Our Whatsapp Group