पुणे (Pclive7.com):- भर दुपारी तळपत्या उन्हात ‘आशा’ सेविकांकडून वाघोलीतील गोरेवस्तीवर घरोघरी जाऊन नागरिकांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू होते. इतक्यात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे आगमन होते आणि ते स्वत: ‘आशा’ सेविकांसोबत सर्वेक्षण करु लागताच गेले दोन महिने निष्ठेने काम करणाऱ्या ‘आशा’ सेविका भारावून गेल्या.
शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. कोल्हे यांनी आज वाघोली येथे भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी गोरेवस्तीवर ‘आशा’ सेविका घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत असल्याची माहिती त्यांना मिळाली. लागलीच त्यांनी गोरेवस्तीवर जाऊन ‘आशा’ सेविकांसोबत सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली. डॉ. कोल्हे यांच्या कृतीनं भारावलेल्या या ‘आशा’ सेविकांच्या भावना अनावर झाल्या. ‘गेले दोन महिने आम्ही उन्हातान्हात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करतो आहोत, पण आमच्या कामाचे कौतुक कुणीच केलं नव्हतं. आज आमच्या कामाचे चीज झाले. डॉ. कोल्हे यांनी आज आमच्या सोबत सर्वेक्षणाचे काम करून आमच्या कामाची पावतीच दिली. त्यांनी केलेलं कौतुक आमच्या आयुष्यभर लक्षात राहील’ अशा भावना या ‘आशा’ सेविकांनी व्यक्त केल्या.
कोरोनाच्या संकटातही धोका पत्करून सर्वेक्षण करण्याचे काम तुम्ही करीत आहात. अशा परिस्थितीत आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत हा विश्वास तुम्हाला देण्यासाठी, तुमचे मनोबल वाढविण्यासाठी मी इथे आलो आहे, असे सांगून डॉ. कोल्हे यांनी त्यांच्यासमवेत काही घरांचा सर्वेही केला. त्याचबरोबर कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा करु असा विश्वासही त्यांना दिला.