पिंपरी (Pclive7.com):- महापालिका कर्मचाऱ्यांसाठी सध्या अस्त्विात असलेल्या धन्वंतरी योजनेऐवजी खासगी विमा योजना लागू करण्याचा विषय सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मतदानाद्वारे मंजूर करण्यात आला. शिवसेनेने आणि राष्ट्रवादीने या विषयाला कडाडून विरोध करताना भाजपावर जोरदार आरोप केले. भाजपाने या विषयाच्या आडून ७ कोटी रुपयांचा महापालिकेच्या तिजोरीवर दरोडा टाकल्याचा आरोप माजी महापौर योगेश बहल यांनी केला.
कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्ववभूमीवर मार्च महिन्यापासून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज ठप्प आहे. काल एकाच दिवशी मार्च, एप्रिल मे व जून महिन्यात आयोजित केलेल्या चार विशेष सभा बोलविण्यात आल्या होत्या. त्यापैकी तीन सभांचे कामकाज पूर्ण झाले. तर चौथी सभा कोरम अभावी तहकूब करावी लागली. महापालिका सेवेतील आणि निवृत्त कामगारांसाठी २०१५ पासून धन्वंतरी स्वास्थ योजना सुरू आहे. भाजपची सत्ता आल्यानंतर योजनेऐवजी धन्वंतरी योजनेऐवजी विमा योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. मार्च महिन्याच्या विषयपत्रिकेवर महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना धन्वंतरी विम्याऐवजी खासगी कंपनीमार्फत आरोग्य कवच मिळावे, यासाठी आर्थिक तरतूद वर्गीकरणाचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या विषयाचे वाचन सुरु असतानाच महापौर उषा ढोरे यांनी घाईघाईने या विषयास मंजुरी दिली. त्यावर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेचे नगरसेवक आक्रमक झाले.
तरीही बोलू न दिल्याने योगेश बहल आक्रमक झाले. बहल म्हणाले, कामगारांना धन्वंतरी योजना हवी आहे आणि भाजपला नको आहे. हा प्रस्ताव कामगारविरोधी आहे. विमा योजनेचा विषय मंजुरीसाठी भाजपने सात कोटी रुपयांचा गंडा महापालिकेच्या तिजोरीवर घातला आहे. त्यात भाजपच्या एका नेत्याचा आणि स्थायी समितीच्या माजी सभापतीचाही समावेश आहे. कामगारांचा विषयाला विरोध असताना केवळ टक्केवारीसाठी हा विषय मंजूर केला जात आहे. भाजप कामगार विरोधी आहे. हे शहरवासियांना कळायला हवे. शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी या विषयावर मतदान घेण्याची मागणी केली. राष्ट्रवादी नगरसेवकांनीही या मागणीस पाठिंबा दिला. तसेच, महापौरांपुढील हौदात धाव घेतली. सभागृहाचे कामकाज चालू न देण्याची भूमिका घेतली. त्यावर विषय मंजूर झाला आहे, आता मतदान घेता येत नाही, अशी भूमिका भाजपने घेतली. विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केल्याने महापौरांना नाइलाजाने मतदान घ्यावे लागले. प्रस्तावाच्या बाजूने ३७ तर विरूद्ध २३ मते पडली. त्यामुळे प्रस्ताव बहुमताने संमत झाल्याचे महापौरांनी जाहीर केले.























Join Our Whatsapp Group