पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात पावसाळ्यात साथीचे रोग वाढण्याची दाट शक्यता आहे. त्याअनुषंगाने महापालिका प्रशासनाने योग्यती काळजी घ्यावी, उपाययोजना कराव्यात अशी मागणी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
याविषयी बोलताना संदीप वाघेरे म्हणाले की, शहरामध्ये पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे. तसेच सद्यस्थितीला शहरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातलेले आहे. अश्या स्थितीत पावसाळ्यामुळे शहरामध्ये साथीचे आजार देखील बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्यामध्ये प्रामुख्याने डेंग्यू, हिवताप आणि लेप्टोस्पायरोसिस या तीन आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो. या तिन्ही आजारांमध्ये शरीरातील प्लेटलेट्सचे प्रमाण कमी होते. डोकेदुखी, ताप येणे, थकवा व खोकला अशी लक्षणे प्रामुख्याने दिसून येतात. ही सर्व लक्षणे शहरामध्ये पसरलेल्या कोरोना विषाणू आजार सदृश्य आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन भीतीचे वातावरण निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरुवातीच्या काळामध्ये महानगरपालिकेमार्फत स्थानिक नगरसेवकांच्या मदतीने शहरातील सर्वच भागांमध्ये रोग प्रतिबंधक (बॅक्टोडेक्स, डेलथामेथ्रिन, अॅमेंटा, सोडीयम हायपोक्लोराईड) औषध फवारणी तसेच धूर फवारणी (पायरेथम) तसेच कचरा कुंडीच्या ठिकाणी पावडर फवारणी करण्यात येत होती. परंतु आता आरोग्य विभागाची ही कामे अत्यल्प प्रमाणावर होताना दिसून येत आहे. तसेच शहरातून पवना, इंद्रायणी, मुळा ह्या तीन नद्या प्रामुख्याने वाहतात या नदयामध्ये जलपर्णी मोठ्या प्रमाणावर साचलेल्या आहेत. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महापालिकेच्या वतीने जलपर्णी काढण्याचे टेंडर काढण्यात आलेले असेल. परंतु ठेकेदार शहरामध्ये जोरदार पाऊस होण्याची वाट पाहत बसलेला असेल यात शंका नाही. या जलपर्णीमुळे डासांची मोठ्या प्रमाणावर उत्पत्ती होऊन त्याचा त्रास नाहक नागरिकांना सोसावा लागणार आहे. तसेच शहरामध्ये रस्त्यांच्या दुरुस्तींची कामे देखील कोरोंना पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या टाळेबंदीमध्ये रखडलेली आहेत. त्यामुळे सदर ठिकाणी डबके साचून डासांच्या उत्पत्तीची केंद्र बनू शकत आहेत अशी कामेही त्वरित मार्गी लावणे गरजेचे आहे. कोरोना पार्श्वभूमीवर व पावसाळ्यामध्ये साथीच्या रोगांची काळजी घेणेसाठी रोगप्रतिबंधात्मक उपाय म्हणजेच (बॅक्टोडेक्स, डेलथामेथ्रिन, अॅमेंटा, सोडीयम हायपोक्लोराईड) औषध फवारणी तसेच धूर फवारणी (पायरेथम) तसेच कचरा कुंडीच्या ठिकाणी पावडर फवारणी आदी उपाययोजना करून तसेच आरोग्य विभागाची मोहीम आखून व अत्यंत जबाबदारीने व मोठ्या प्रमाणावर करणे गरजेचे झाले आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेच्या दवाखान्यात सर्दी, पडसे, ताप याचे रुग्ण दाखल झाल्यास व्यवस्थित तपासणी करून, शंका आल्यास SWAB (घश्याची द्राव्य) तपासणी करावी, जेणेकरून नागरिकांमध्ये भीतीचे व संभ्रमाचे वातावरण राहणार नाही. याबाबत आयुक्तांनी स्वतः जातीने लक्ष घालून त्वरित उपाययोजना करावी अशी मागणीही संदीप वाघेरे यांनी केली आहे.























Join Our Whatsapp Group