पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातून राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी स्पर्धा वाढू लागली असून, या स्पर्धेत आता राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनीही उडी घेतली आहे. पक्षाच्या चांगल्या आणि अडचणीच्या काळातही एकनिष्ठ राहिल्यामुळे आपल्याला संधी मिळेल, असा दावा वाघेरे यांनी केला आहे. तसेच शहरातील बहुतांश नेत्यांचा आपल्याला पाठिंबा असल्याचेही वाघेरे यांनी म्हटले आहे.
राज्यपाल नियुक्त कोट्यातील १२ जागा रिक्त होत आहेत. या जागांवर पुढील महिन्यात नियुक्ती करण्यात येणार आहे. सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सरकार असल्यामुळे या तीन पक्षांच्या प्रत्येकी चार नेत्यांना आमदारकीची संधी मिळणार आहे. राष्ट्रवादीच्या कोट्यातील जागेवर संधी देण्यात यावी, यासाठी संजोग वाघेरे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्या समर्थकांचे निवेदनही सादर केले. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारीही उपस्थित होते. अजित पवारांनी यावेळी सर्वांशी संवाद साधताना शरद पवारांसोबतच आपण प्रदेशाध्यक्षांनाही भेटून चर्चा करावी, अशी सूचना केली. यानंतर वाघेरे यांनी रविवारी जयंत पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे.
वाघेरे कुटुंब हे गेल्या ३५ वर्षांपासून पवार कुटुंबीयांशी एकनिष्ठ आहे. कितीही स्थित्यंतरे आली तरी वाघेरे हे पवारांसोबतच राहिले. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत पवारांचे अनेक समर्थक दुरावले मात्र वाघेरे यांनी निष्ठेने पक्षाची धुरा सांभाळताना महापालिका निवडणुकीचा किल्ला लढविला. गेल्या पाच वर्षांपासून ते शहराध्यक्षपदाची धुरा सांभाळत असून, महापौर, नगरसेवक असा कामाचा अनुभव आहे. तसेच राज्यपाल नियुक्त सदस्यत्वाचे निकषही ते पूर्ण करू शकतात. सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींमधून राज्यपाल नियुक्त १२ जागांवर विधान परिषद सदस्य म्हणून निवड करण्यात यावी, असा निकष आहे. वाघेरे हे पिंपरी येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयाच्या समितीवर सदस्य आहेत. स्वतः उत्तम खेळाडू आहेत. कबड्डी असोसिएशनच्या जिल्हा समितीवरही ते कार्यरत आहेत. तसेच, किक बॉक्सिंगच्या पिंपरी चिंचवड अध्यक्षपदाची धुराही ते सांभाळत आहेत.
























Join Our Whatsapp Group