पिंपरी (Pclive7.com):- पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी घटनेत चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत भारतीय सैन्यातील वीस जवानांना वीरमरण आले. चीनच्या या भ्याड, विश्वासघातकी कृत्याचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टी, निगडी प्राधिकरण विभागाच्या वतीने प्राधिकरणातील भेळ चौक (ज्ञानेश्वर चौक), पेठ क्रमांक २५ येथे रविवारी (दि.२१) सायंकाळी चिनी वस्तुंची होळी करून आणि चीन राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आले.
पिंपरी चिंचवड महापालिका ‘अ’ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, माजी उपमहापौर शैलजा मोरे, माजी महापौर आर.एस. कुमार, भाजपा मंडल अध्यक्ष विजय शिनकर, भाजपा पिंपरी चिंचवड शहर अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष सलीम शिकलगार, भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र सचिव अनुप मोरे, भाजपा शहर चिटणीस माणीक फडतरे, भाजपा शहर उपाध्यक्ष राजेंद्र बाबर यांची उपस्थिती होती.
यावेळी नागरिकांना आवाहन करताना शर्मिला बाबर म्हणाल्या की, चीन भारताला मोठ्या प्रमाणावर वस्तुंची निर्यात करून अब्जावधी रुपयांची कमाई करतो. या कमाईतून लष्करावर प्रचंड प्रमाणात खर्च करून चीन भारतीय सीमेवर सातत्याने उपद्रवी कारवाया करतो. स्वस्त किमतीच्या प्रलोभनाला बळी पडून असंख्य नागरिक आपल्या दैनंदिन व्यवहारात अनेक चिनी बनावटीच्या वस्तू वापरतात. चीन सीमेवर नुकत्याच घडलेल्या दुष्कृत्याच्या निषेधार्थ पक्षीय राजकारण, मतभेद बाजूला ठेवून भारतीयांनी एकजुटीने, संयमाने चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला; तर निश्चितच चीनचे आर्थिक कंबरडे मोडेल.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतांतून विस्तारवादी चिनी षडयंत्रांची नागरिकांना माहिती दिली. नागरिकांच्या वतीने नारायण पांडे, श्रीकृष्ण अभ्यंकर, नीलिमा कोल्हे, मनीषा पोळ, योगेश भागवत, आशिष राऊत, प्रसेन अष्टेकर, विजय नेहरे, नितीन हगवणे, सागर घोरपडे यांनी दैनंदिन घरगुती चिनी वस्तुंची होळी करून तसेच शी जिनपिंग यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करताना ‘वंदे मातरम्’ , ‘भारतमाता की जय!’ अशा घोषणा दिल्या.
























Join Our Whatsapp Group