पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहर भाजपने अयोध्येत श्रीराम मंदिराचे भूमीपूजन झाल्याचा आनंदोत्सव बुधवारी (दि. ५) अनोख्या पद्धतीने साजरा केला. श्रीराम मंदिर निर्माणासाठी १९९२ मध्ये अयोध्येकडे कूच केलेल्या पिंपरी चिंचवडमधील ५०० कारसेवकांना शहर भाजपकडून श्रीराम आणि राम मंदिराची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप आणि भाजपचे शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी कारसेवकांच्या घरी जाऊन त्यांचा गौरव केला. या अनोख्या गौरवामुळे आणि श्रीराम मंदिराच्या निर्माणाचे प्रत्यक्ष भूमीपूजन झाल्याने कारसेवक भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.
श्रीराम जन्मभूमीचा गेल्या ५०० वर्षांपासूनच्या वादावर न्यायालयीन आदेशातून तोडगा निघाला. त्यानुसार अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीराम मंदिर निर्माणाचे आज भूमीपूजन पार पडले. श्रीराम मंदिराचे भूमीपूजन म्हणजे हिंदूंच्या स्वप्नपूर्तीच्या दृष्टीने पडलेले पाऊल आहे. हा क्षण ऐतिहास असल्याने संपूर्ण देशात जल्लोषाचे आणि आनंदोत्सवाचे वातावरण आहे. पिंपरी चिंचवडमध्येही हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पिंपरी चिंचवड शहर भाजपने हा आनंदोत्सव अनोख्या पद्धतीने साजरा केला.
श्रीराम मंदिराच्या निर्माणासाठी ६ डिसेंबर १९९२ मध्ये मोठे आंदोलन झाले होते. त्यावेळी पिंपरी चिंचवडमधून ५०० कारसेवक अयोध्येला गेले होते. आजच्या ऐतिहासिक क्षणासाठी या कारसेवकांनी मोठे योगदान दिलेले आहे. त्यामुळे या कारसेवकांचा योग्य तो सन्मान व्हावा या उद्देशाने शहर भाजपने त्यांच्या घरी जाऊन गौरव केला. भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप आणि भाजपचे शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी विनायकराव थोरात, हेमंत हरहरे, सतिश गोरडे, विनय काने, प्रशांत हरहरे या कारसेवकांच्या घरी जाऊन त्यांना श्रीराम आणि राम मंदिराची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी संजय भंडारी, नगरसेवक अँड. मोरेश्वर शेडगे, अनुप मोरे आदी उपस्थित होते. हा गौरव झाल्यानंतर विनायकराव थोरात, हेमंत हरहरे यांनी १९९२ मध्ये पिंपरी चिंचवड ते अयोध्येपर्यंतचा झालेला प्रवास, तेथे केलेली कारसेवा याचे जिवंत अनुभव सांगितले. शहरातून ५०० कारसेवक अयोध्येला गेले होते. त्यावेळी फक्त अंगावरील कपड्यावर गेलेल्या कारसेवकांना तेथील नागरिकांनी कशा पद्धतीने मदत केली, तेथे घडलेला प्रसंग याच्या आठवणी विनायक थोरात आणि हेमंत हरहरे यांनी जाग्या केल्या.
कारसेवकांच्या या गौरबाबत बोलताना भाजप शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात म्हणाले, “राम मंदिर निर्माणामध्ये कारसेवकांचे योगदान मोठे आहे. त्यांच्याविषयी आदरभाव व्यक्त करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर भाजपकडून त्यांचा गौरव करण्यात आला. भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते आज प्रातिनिधीक स्वरूपात शहरातील काही मोजक्या कारसेवकांचा सत्कार करण्यात आला आहे. शहरातील उर्वरित सर्व कारसेवकांचे तसेच हयात नसलेल्या कारसेवकांच्या कुटुंबियांचे त्या त्या भागातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार असल्याचे भाजप शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी सांगितले.






















Join Our Whatsapp Group