पुणे (Pclive7.com):- राज्यात येत्या १५ सप्टेंबरपासून ‘स्वास्थ्य महाराष्ट्र’ मोहीम सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राबवण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत राज्यातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींची माहिती घेऊन सारी, इतर व्याधी आणि ६० वर्षांपुढील नागरिकांचा डाटा तयार केला जाणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी दिली.
पुण्यातील कोरोना सद्य:स्थितीच्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आरोग्यमंत्री टोपे यांनी ही माहिती दिली. ही मोहीम १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर आणि १५ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर अशा दोन टप्प्यात राबवण्यात येणार आहे. मोहिमेंतर्गत राज्यातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींमध्ये सारी, इतर व्याधी किंवा अन्य लक्षणे असल्यास ती नोंदवली जाणार आहेत. तसेच ६० वर्षांपुढील पुढील व्यक्तींचा मिळून एक डाटा तयार करण्यात येणार आहे. लक्षणे असणाऱ्या आणि इतर व्याधी व ज्येष्ठ नागरिकांवर देखरेख ठेवली जाणार असून गरज असल्यास संबंधितांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले जाणार आहे.
दरम्यान, महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत कोरोना रुग्णांवर उपचार करताना शासकीय दरांपेक्षा जादा रक्कम आकारल्यास संबंधित रुग्णालयांना पाचपट दंड आकारण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. वेळप्रसंगी संबंधितांवर गुन्हा दाखल करावा किंवा रुग्णालयाला महात्मा फुले योजनेतून वगळण्याचेही अधिकार दिले आहेत. तसेच दीड लाख किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या प्रत्येक देयकांचे पूर्वलेखापरीक्षण झालेच पाहिजे, असे आदेश प्रशासनाला दिले आहेत, असेही टोपे यांनी सांगितले.
ग्रामीण भागात क्ष-किरण व्यवस्थेचे जाळे
सध्या वैद्यकीय शाखेच्या पदव्युत्तर पदवीचे दोन हजार विद्यार्थी परीक्षा देत आहेत. परीक्षा झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना कोरोना उपचारांसाठी कंत्राटी पद्धतीने सामील करून घेतले जाणार आहे. राज्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने चाचण्यांचे अहवाल येण्यास विलंब लागतो. परिणामी गंभीर रुग्णांना तातडीने उपचार मिळण्यासाठी संबंधित रुग्णांचे क्ष-किरण छायाचित्र (एक्स-रे) क्ष-किरण तज्ज्ञांकडे (रेडिओलॉजिस्ट) पाठवून रुग्णाला कोरोनाचा किती संसर्ग झाला आहे, रुग्णाला प्राणवायू किंवा कृत्रिम श्वसन यंत्रणेची गरज आहे किंवा कसे, याची माहिती मिळण्याची व्यवस्था उपलब्ध करण्यात येणार आहे, असेही टोपे यांनी या वेळी सांगितले.




















Join Our Whatsapp Group