हिंजवडी (Pclive7.com):- संसर्गजन्य आजारांवर अत्यंत उपयुक्त ‘गुळवेल’ वनस्पतींचे हिंजवडीमध्ये हभप शेखर महाराज जांभूळकर युवा मंचच्या वतीने मोफत वाटप करण्यात येत आहे. तयार ‘गुळवेल’ वनस्पतींचे पाकीट आणि वापर याविषयी माहिती पत्रक सामाजिक बांधिलकी म्हणून हिंजवडीतील ग्रामस्थांना घरोघरी जाऊन वाटप करण्यात येत आहे.
हभप शेखर महाराज जांभूळकर, शरद जांभूळकर, माऊली काकडे, माऊली जांभूळकर, माऊली बलकवडे, प्रशांत खारुने, अक्षय बलकवडे, मल्लिकार्जुन मुलगे हे वृक्षमित्र या उपक्रमासाठी परिश्रम घेत आहेत.
वटपौर्णिमा आणि जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून हभप जांभुळकर यांच्या पुढाकारातून स्थानिक वृक्षमित्रांच्या सहकार्याने हिंजवडी परिसरामध्ये ‘वट वन्य वृक्षारोपण’ उपक्रम घेण्यात आला होता. माण, हिंजवडी परिसरातील टेकडी आणि डोंगर उतारावर शेकडो पर्यावरण पुरक देशी झाडांची लागवड करण्यात आली होती.
सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असल्यास आपण कोरोनाशी सहज सामना करू शकतो. मधुमेह, मज्जादाह, हृदयरोग, मानसिक ताण, संधीवात यावर गुळवेल वनस्पती अधिक फायदेशीर असून शक्तीवर्धक तसेच शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी गुळवेलचे सेवन अत्यंत उपयुक्त ठरत आहे, असे शेखर महाराज जांभुळकर यांनी सांगितले.



















Join Our Whatsapp Group