पिंपरी (Pclive7.com):- श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा पाणी उतरणे अभिषेक सोहळ्याचे गुरूवार दिनांक १ ऑक्टोबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. यावेळी रायगडच्या शिवराज्यभिषेकाचे राजपुरोहित प्रकाशस्वामी यांच्या हस्ते हा अभिषेक सोहळा पार पडणार असल्याचे श्री शिवस्मारक समिती, अखिल पिंपरी शिवजयंती उत्सव समिती तसेच समस्त पिंपरीगांव ग्रामस्थ यांच्यावतीने संजोग वाघेरे पाटील यांनी सांगितले आहे.
हा अभिषेक सोहळा उद्या गुरूवार दिनांक ०१ ऑक्टोबर २०२० रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, पिंपरी वाघेरे येथे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत होणार असून या कार्यक्रमाचे शिव प्रेमी भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री शिवस्मारक समिती, अखिल पिंपरी शिवजयंती उत्सव समिती तसेच समस्त पिंपरीगांव ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले आहे.
पिंपरीगावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनास्थ पुतळा व्हावा ही सर्व ग्रामस्थ, शिवप्रेमी, व तरुण वर्गाची अनेक वर्षापासूनची इच्छा होती. यासाठी नगरसेविका उषा वाघेरे तसेच माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. याबाबतीत सातारा येथील शिल्पकार संजय कुंभार यांची सातारा येथे जाऊन प्रत्यक्ष भेट घेऊन क्ले मॉडेलची पाहणी करून कामाची माहिती घेण्यात आली होती. त्यानंतर कलासंचनालय मुंबई तसेच मुख्य वास्तुशास्त्रज्ञ मुंबई, पोलिस आयुक्त पिंपरी चिंचवड यांच्याशी संपर्क साधून प्रस्ताव मंजूर करण्याची विनंती करण्यात आली होती.
या सर्व विभागांची परवानगी मिळाल्यानंतर जिल्हास्तरीय पुतळा समिती अध्यक्ष डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे प्रस्ताव मंजूरीसाठी देण्यात आला होता. दि.२२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी व महापालिका अधिकारी यांच्या समवेत झालेल्या बैठकीमध्ये याविषयी सकारात्मक चर्चा होऊन आज डॉ. राजेश देशमुख यांनी शासकीय अटी व शर्थींच्या अधीन राहून छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनास्थ पुतळा बसविण्याच्या कामास मंजूरी देण्यात आली आहे.
या मिळालेल्या मंजूरीमुळे पिंपरीगाव व परिसरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक शिवप्रेमी, तसेच तरुण मंडळी व जेष्ठ नागरिकांनी संजोग वाघेरे पाटील यांचे आभार मानले आहेत.






















Join Our Whatsapp Group