पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी ३५ वर्षे सेवेत असलेल्या ड्रायव्हरचा अनोखा सन्मान केला. ड्रायव्हर म्हणून ३५ वर्ष सेवा बजावल्यानंतर, निवृत्तीच्या दिवशी निरोपासाठी खुद्द आयुक्त ड्रायव्हिंग सीटवर बसले आणि आपल्या ड्रायव्हरचं सारथ्य केलं.
पिंपरी चिंचवडचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण तुपे गाडी चालवत आहेत. आणि त्यांचे ड्रायव्हर दत्तात्रय गाजरे मागे बसलेत, असं चित्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आज पाहायला मिळालं. आजचा दिवस गाजरे यांच्या आयुष्यात अतिशय महत्वाचा ठरला. आनंद, दुखः आणि सन्मान अन अभिमानाचाही.. ३५ वर्ष महानगरपालिकेत वाहनचालक म्हणून सेवा देणारे सेवानिवृत्त झाले.
गाजरे यांच्या सेवानिवृत्तीचं हटके सेलिब्रेशन करण्याचं अतिरिक्त आयुक्तांनी ठरवलं. त्यांनी स्वत: गाजरे यांचं सारथ्य करण्याचा निर्णय घेतला. आपल्या महानगरपालिकेच्या कार्यालयापासून ते गाजरे यांच्या निवास स्थानापर्यंत ते स्वतः चालक झाले आणि दत्तात्रय यांना आपल्या जागेवर बसविले.
यावेळी झालेल्या सेवानिवृत्ती समारंभात महापौरांनी त्यांना सन्मानित केलं. आयुष्यभर आपल्या साहेबांना इच्छितस्थळी सुखरुप पोहोचविणारे दत्तात्रय गाजरे, हे अतिरिक्त आयुक्तांनी केलेल्या या सन्मानाने गहिवरून गेले होते. अतिरिक्त आयुक्तांनी ड्रायव्हरचा अनोखा सन्मान केल्यामुळं सध्या प्रविण तुपे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.























Join Our Whatsapp Group