पिंपरी (Pclive7.com):- कोरोना महामारीच्या काळात सर्व सामान्य नागरिकांना जगणे कठीण झाले आहे. अनेकाच्या नोक-या गेल्या आहेत तर काहींच्या हाताला काम मिळेना. यातच शाळेची फी भरणे देखील कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पिंपळे सौदागर येथील पालकांनी खासदार श्रीरंग बारणे यांची भेट घेवून शिक्षण संस्था चालकांनी विद्यार्थ्यांची फी कमी करण्याची मागणी केली.
पिंपरी चिंचवड शहरात अनेक शिक्षण संस्था आहेत. यातील अनेक संस्थाची वार्षिक फी लाखांच्यावर आहे. सर्वसामान्य नागरिकांना फी भरणे कठीण झाले आहे. फी भरली नाही तर विद्यार्थ्यांना शाळेतून काढण्याची धमकी दिली जाते. या पार्श्वभूमीवर खासदार श्रीरंग बारणे यांची पिंपळे सौदागर येथील पालकांनी भेट घेवून आपल्या व्यथा मांडल्या.
ऑनलाईन पद्धतीने दिले जाणारे शिक्षण हे परिणामकारक नाही. ज्या मुलांनी फी भरली नाही त्या मुलाकडे लक्ष दिले जात नाही. फी भरली नाही तर विद्यार्थ्यांना शाळेतून काढण्याची धमकी संस्था चालक करतात. विद्यार्थी शाळेत जात नाही तरी क्रीडा, वाचनालय, कंम्प्युटर, म्युझीक या सारखे व इतर शैक्षणिक शुल्क आकारले जाते. पहिली ते तिसरी मधील विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लास मध्ये काय शिकवतात हेच कळ्त नाही.
एकूणच शिक्षणाचा खेळखंडोबा झाला असून ह्याही परिस्थितीत काही शिक्षण संस्था चालक फी वसूलीचा तगादा लावत आहेत. अशा परिस्थितीत काही प्रमाणात शाळांनी विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत द्यावी अशी मागणी पालकच्या शिष्टमंडळाने केली.
खासदार बारणे यांनी सर्व पालकांचे म्हणणे ऐकून घेवून शिक्षण संस्था चालकांबरोबर तसेच शिक्षण अधिका-यांबरोबर चर्चा करून योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन पालकांना दिले.






















Join Our Whatsapp Group