महावितरण अधिकाऱ्यांकडून दोन दिवसांत समस्या सोडवण्याचे निर्देश
पिंपरी (Pclive7.com):- मोशी, चिखली आदी परिसरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. औद्योगिक क्षेत्रासह नागरिक, व्यावसायिक हैराण झाले आहेत. त्यामुळे या भागातील वीज समस्या तात्काळ सोडवा, अशा सूचना भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी दिल्या आहेत.
वीज समस्याबाबत नागरिकांच्या तक्रारी आणि अधिकाऱ्यांच्या अडचणी याबाबत आमदार लांडगे यांची महावितरण अधिकारी आणि संबंधित सोसायट्यांमधील प्रतिनिधी, व्यापारी प्रतिनिधी यांची तातडीची बैठक सोमवारी सकाळी घेतली.
यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता गवारे आणि भोसरीचे अतिरिक्त अभियंता, सहाय्यक अभियंता आदी उपस्थित होते.
स्वराज सोसायटीतील नागरिकांना दिलासा…
वीजच नसल्याने परिणामी इंटरनेट सेवा बंद पडत असून व मोबाईल लॅपटॉप चार्जिंग करणे शक्य नसल्याने शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. अशा विविध अडचणींचा सामना मोशीतील स्वराज गृहनिर्माण सोसायटी मधील सुमारे ६२२ सदनिकाधारक करत आहेत. याबाबत रहिवाशांनी तक्रारी केल्या होत्या. अधिकाऱ्यांसमोर रहिवाशांनी गाऱ्हाणे मांडले. यावर आमदार लांडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, मोशी, चिखली आणि परिसरात वीज समस्या निकालात काढण्यासाठी अधिकाऱ्यांनी तात्काळ उपाययोजना कराव्यात. नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. सोसायटीमधील सदनिकाधारकांना पर्यायी वीज व्यवस्था करण्यासाठी नाहक भुर्दंड बसत आहे. महावितरण प्रशासनाने याकडे गंभीरपणे लक्ष घालावे. यापुढे नागरिकांच्या तक्रारी येता कामा नये, असा सज्जड इशाराही आमदार लांडगे यांनी दिला आहे.






















Join Our Whatsapp Group