पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र पर्यावरण विभागाने कारवाई केल्यास थेरगाव येथील पद्मजी पेपर मिल बंद होऊ शकते. त्यामुळे लॉकडाऊन व आर्थिक मंदीमध्ये तेथील ७०० कामगार बेकार होऊन त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल. हे कृत्य शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी करू नये, असा सल्ला माजी नगरसेवक संतोष बारणे यांनी यांनी गुरूवारी (दि.२९) पत्रकार परिषदेत दिला. तसेच, जानेवारी महिन्यात होणारी नोकरी भरती डोळ्यासमोर ठेऊन खासदार यांनी तक्रार केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
पद्मजी मिलमुळे प्रदूषण होत असून कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी खासदार बारणे यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे नुकतीच केली आहे. या बाबत माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे व सामाजिक कार्यकर्ते गणेश गुजर म्हणाले की, खासदार बारणे यांच्या घराच्या भिंतीला लागून पद्मश्री मिल आहे. त्यांनी थेट कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा केली असती तर, त्यांनी तत्काळ उपाययोजना करून प्रदूषण रोखले असते. मात्र, तसे न करता त्यांनी थेट पर्यावरण मंत्र्यांकडे तक्रार करणे हे त्यांना शोभत नाही, अशी टीका त्यांनी केली.
कंपनीत ७०० कामगार असून, त्यातील ६० टक्के कामगार हे थेरगाव परिसरातील आहेत. लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्या बंद पडून कामगारांच्या नोकर्या जात आहेत. पर्यावरण विभागाने कारवाई केल्यास ही ३५ वर्षे जुनी कंपनी बंद होऊ शकते. तेथील सर्व कामगार बेरोजगार होण्याचा धोका आहे. परिणामी, त्यांच्या कुटुंबाची उपासमार होणार आहे, असे ते म्हणाले.
तसेच, जानेवारी महिन्यात कंपनीत ३०० ते ३५० कामगारांची भरती होणार आहे. त्यावर डोळा ठेऊन दबाव टाकण्याच्या हेतूने खासदारांनी ही तक्रार केली असावी, असा आरोप त्यांनी केला आहे. शेतकर्यांच्या प्रश्नांसाठी दूर अंतरावरील मावळ तालुका तसेच, रायगड जिल्ह्यात जाऊन पाठपुरावा करणार्या खासदारांनी घराशेजारच्या कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा केली असती, तर हा प्रश्न निकाली निघाला असता, असा विश्वास ही बारणे यांनी व्यक्त केला. खासदारांनी कामगरांचे हित लक्षात घ्यावे, असा सल्ला त्यांनी दिला.
गणेश गुजर यांनी सांगितले की, स्थानिक रहिवाशी कृती समितीच्या वतीने कंपनी व्यवस्थापनाची भेट घेऊन येत्या १५ दिवसांत प्रदूषण रोखण्याबाबत उपाययोजनाची करावी, अशी मागणी केली जाणार आहे.






















Join Our Whatsapp Group