पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहराच्या उपमहापौर पदाचा फैसला आज (दि.०२) होणार आहे. दुपारी ३ ते ५ या वेळेत अर्ज दाखल करण्याची मुदत असून भाजपाकडून केशव घोळवे यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजाविली असून पुन्हा पिंपरी मतदारसंघातच हे पद जाणार आहे. भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, लक्ष्मण जगताप यांना हा धक्का दिल्याचे मानले जात आहे.
माजी उपमहापौर तुषार हिंगे यांनी १४ ऑक्टोबर २०२० रोजी तडकाफडकी पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे उपमहापौरपद रिक्त झाले आहे. त्या जागी त्यांच्याच प्रभागातील घोळवे यांची निवड होणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.
उपमहापौरपदासाठी आज (दि.०२) दुपारी ३ ते ५ या वेळेत अर्ज दाखल करायचे आहेत. भाजपमधील गोपीनाथ मुंडे गटाने प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्या नेतृत्वात उपमहापौरपद मिळविण्यासाठी मोठी ‘फिल्डिंग’ लावली होती. पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमहापौरपदासाठी घोळवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.
केशव घोळवे यांची कामगार नेते अशी ओळख आहे.
संभाजीनगर, शाहूनगर, मोरवाडी प्रभागातून ते २०१७ च्या निवडणुकीत भाजपकडून निवडून आले आहेत. पहिल्यांदाच ते निवडून आले आहेत. मातब्बर समजले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नारायण बहिरवाडे यांचा त्यांनी पराभव केला होता. अ क्षेत्रीय कार्यालयाचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषविलेले आहे.






















Join Our Whatsapp Group