चिखली (Pclive7.com):- नवनगर विकास प्राधिकरण हद्दीत नवीन कारागृह करण्याच्या महाविकास आघाडीच्या निर्णयाचा पिंपरी चिंचवड वासियांनी निषेध केला आहे. तर दुसरीकडे नवीन कारागृह होऊ देणार नसल्याचा निर्धार भाजपने केला आहे. भाजपचे मनपा स्विकृत सदस्य दिनेश यादव यांनी वेळ पडली तर रस्त्यावर येऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला असून आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्फत या प्रस्तावाला लोकतांत्रिक पद्धतीने विरोध करणार असल्याचे सांगितले आहे.
चिखली भागात नवीन कारागृह उभारण्याची घोषणा गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी केली आहे. त्याचे तीव्र पडसाद चिखलीत उमटण्याची शक्यता आहे. कारागृह रहिवासी भागात उभारून शासन मूळ उद्देशाला हरताळ फासत असल्याची जनभावना आहे. चिखली हा भाग रहिवासी वसाहत असताना कुणालाही विश्वासात न घेता परस्परपणे निर्णय कसा घेतला गेला? अशी प्रतिक्रिया उमटू लागली आहे. चिखलीत कारागृह होऊ नये अशी जनभावना आहे आणि ती शासनापर्यंत आमदार महेशदादा लांडगे यांच्यामार्फत पोहोचवू. तरीही जर शासनाने निर्णय न बदलल्यास आंदोलन करून हा निर्णय रद्द करायला भाग पाडू असे दिनेश यादव यांनी म्हटले आहे.
पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणला शेतकऱ्यांनी जमिनी गोरगरीब जनतेला घरे घेता यावीत या उद्देशासाठी दिल्या आहेत. ना की कारागृह निर्मितीसाठी असे नागरिकांचे म्हणणे आहे. लोकभावना ओळखून हा निर्णय रद्द करावा अशी मागणी केली जाऊ लागली आहे. या प्रकल्पाऐवजी विकासाचा अन्य काही चांगला प्रकल्प शासनाने आणावा अशी मागणी होत आहे.






















Join Our Whatsapp Group