सांगली (Pclive7.com):- एखाद्या बकऱ्याला बाजारात करोडोची बोली लागल्याचं तुम्ही कधी ऐकलतं का? ऐकलं नसेल तर हे खरं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या बकऱ्याच्या मालकाने दीड कोटी रुपयांची बोली लावली होती. मात्र खरेदीदारानं जास्तीत जास्त ७० लाख रुपयांतच व्यवहार होईल असं सांगितलं. या बकऱ्याच्या ‘मोदी’ या नावाच्या करिश्म्यामुळे एवढी मोठी बोली लागली आहे. सांगली जिल्ह्यातल्या आटपाडीच्या प्राण्यांच्या बाजारातील ही घटना आहे.
गेल्या आठ महिन्यांपासून लॉकडाउनमुळे सर्वकाही ठप्प झालं असल्याने आटपाडीतील प्राण्यांच्या बाजारालाही मोठा फटका बसला. प्राणी विक्रेत्यांना यामुळे मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागलं. मात्र, आता इथली परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. पुन्हा एकदा प्राण्यांची मागणी वाढली आहे.
दरम्यान, प्रसिद्ध असलेल्या आटपाडीच्या या प्राण्यांच्या बाजारात कार्तिकी पौर्णिमेनिमित्त मोठ्या प्रमाणावर शेळ्या-मेंढ्या विक्रीसाठी आल्या होत्या. यापैकी एका बकऱ्याला तब्बल ७० लाखांची बोली लागली. सांगोला तालुक्यातील चांदोळवाडीचे शेतकरी बाबुराव मेतकरी यांचा हा बकरा असून त्यांना तो दीड कोटी रुपयांना विकायचा होता.
तुम्ही म्हणालं या बकऱ्यामध्ये असं काय विशेष आहे. तर या बकऱ्याचं नाव ‘मोदी’ असं ठेवण्यात आलं असून त्याच्या मालकाने तब्बल दीड कोटी रुपयांची बोली लावली होती. खरेदीदारानं त्यांना जास्तीत जास्त ७० लाख रुपयांतच व्यवहार होईल असं सांगितलं. मात्र, मेतकरी यांना ते मान्य झालं नाही त्यामुळे हा बकरा अद्यापही विकला गेला नाही.






















Join Our Whatsapp Group