पिंपरी (Pclive7.com):- प्रताप सरनाईक यांच्यावर ‘ईडी’ने लावलेल्या चौकशीला कुठलाच आधार नव्हता. आपण एखाद्या व्यक्तीपर्यंत जाऊ शकत नाही म्हणून त्याच्या सहकार्यांपर्यंत जायचं. कुठेही ‘ईडी’चा वापर करायचा. हे जे काही अनेक दिवसांपासून भारतीय जनता पार्टीचं चाललयं आहे. ही ईडी’च त्यांना संपविल्या शिवाय राहणार नाही असं वक्तव्य राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नातून मोफत डिजिटल श्रवणयंत्र वाटपाचा कार्यक्रम भोसरी येथे आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर प्रसिध्दीमाध्यमांशी बोलताना मुंडे यांनी हे वक्तव्य केले आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, शिरूरचे आमदार अशोक पवार, माजी आमदार विलास लांडे, देवदत्त निकम, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, राष्ट्रवादीचे नगरसेवक, नगरसेविका तसेच पदाधिकारी उपस्थित होेते.
पुढे बोलताना मुंडे म्हणाले की, हे केंद्रातील भाजपाचे सरकार शेतकरी, शेतमजूर कामगारांच्या विरोधातील आहे. सुरुवातीला विश्वास देतात की आम्ही तुमच्यासोबत आहोत डोक्यावर घेऊ. मात्र हेच पुन्हा सत्तेत आल्यावर शेतकरी आणि कामगार मजुरांना पायाखाली तुडवतात. याचा प्रत्यय आता सुरू असलेल्या आंदोलनात होतोय. शेतकऱ्यांच्या बाबत केंद्रांने जो कायदा केला आहे, तो कायदा शेतकऱ्यांना पूर्णपणे संपवणार आहे. उद्या जर शेतकरी संपला तर हा कृषीप्रधान असलेला देश संपणार आहे.























Join Our Whatsapp Group