ज्या आहारावर आपले पोषण होते, त्याचा निर्माता तो शेतकरी, स्वत: कुपोषित आहे का, तो काय खातो याचा आपण कधी विचार करतो का? शेतकरी महिलांना शेतात सतत वाकून काम करावे लागते. त्यामुळे त्यांना कायम कंबरदुखी होत असते. चिखलात, पाण्यात राहून काम करावे लागते त्यामुळे त्यांच्या पायांना सुन्नपणा येतो.
हिवाळ्यात शेतात काम करताना अनेकांना टायफाइड, पॅराटायफाइड , मलेरिया होतो. यावेळी नदीमध्ये किंवा ओहोळातले सापडणारे काळे खेकडे पकडावे, खेकडे चुलीत किंवा गॅसवर भाजावे. त्या खेकडय़ाच्या पोटातले मांस (पिवळा भाग) खाऊन टाकायचे. असे केल्याने कुठल्याही प्रकारचा ताप होत नाही किंवा झाल्यास लवकर बरा होतो.
नदीतले हे खेकडे थंडीच्या ऋतूमध्येच खाल्ल्याने अंगामध्ये ऊब येते आणि ताकद मिळते. कारण हे खेकडे खूप गरम असतात. म्हणून ज्यांना अॅसिडिटी, मूळव्याधीचा त्रास आहे, त्यांनी हे अजिबात खाऊ नये.
शेतकऱ्याने सकाळी शेतावर जाताना कच्चे अंडे फोडून तसेच प्यावे, त्यामुळे दिवसभर कष्टाची कामे करण्यासाठी त्यांना ताकद पुरते. या ठिकाणी मात्र एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे कच्चे अंडे पचवण्याची ज्यांची ताकद आहे, म्हणजेच ज्यांचा अग्नी उत्तम आहे अशांनी त्याचे सेवन करावे. थंडीमध्ये उडदाच्या डाळीचे घुटे(आमटी) भरपूर लसणाची फोडणी घालून करावे किंवा ज्वारीच्या भाकरी उडदाची डाळ घालून कळणाची भाकरी घ्यावी. त्याने ताकद टिकून राहते. कामाला जाताना पहाटे घराबाहेर पडावे लागते, तेव्हा सकाळी नऊ वाजता गूळ घातलेले उडदाचे एक-दोन लाडू खावेत. त्याने थंडीपासून रक्षण होते व कामासाठी ताकद पुरते.
उन्हाळ्यामध्ये बघा तीव्र उन्हात त्यांना काम करावे लागते. त्यावेळी जेवणात शक्यतो पांढरा कांदा, नाहीतर लाल कांदा जरूर वापरावा. तोच कांदा त्यांनी डोक्यावरच्या पागोटय़ात किंवा खिशात ठेवावा, महिलांनी त्यांच्या ओच्यात ठेवावा. त्यामुळे त्या तीव्र उन्हापासून त्यांचा बचाव होतो. उन्हात सतत काम केल्याने येणारी चक्कर, भ्रम यांपासून संरक्षण होते, त्यासाठी त्याच कांद्याचा रस तळहाताला व तळपायाला चोळावा. या ठिकाणी परत एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या ऋतूत जी फळे, भाज्या येतात. ते आपल्या शेतात पिकवतात, त्याचा आहारात नक्कीच वापर करावा. त्यामुळे त्या वेळी होणाऱ्या आजारांना ते दूर ठेवू शकतात.





















Join Our Whatsapp Group