पुणे (Pclive7.com):- करोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे विभाग गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) पुणे, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्य़ांमधील ५६४७ सदनिकांसाठी शुक्रवारी (२२ जानेवारी) नेहरू मेमोरियल सभागृह येथे ऑनलाइन लॉटरी जाहीर केली जाणार आहे. नागरिकांनी या ठिकाणी गर्दी करू नये, यासाठी संकेत स्थळावरून घरबसल्या निकाल पाहता येणार आहे. तसेच विजेत्यांना ई-मेल आणि लघुसंदेशांद्वारे माहिती मिळणार आहे.
लॉटरी जाहीर करण्याचा उद्घाटन समारंभ सकाळी नऊ वाजता होणार आहे. त्यानंतर सकाळी दहा वाजल्यापासून ऑनलाइन लॉटरी जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. याबाबत म्हाडा पुणे विभागाचे मुख्य अधिकारी नितीन माने-पाटील म्हणाले, ‘करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर नियमाचे पालन करून लॉटरी जाहीर करण्यात येणार आहे. त्याकरिता संकेत स्थळावरून घरबसल्या निकाल पाहता येणार आहे. परिणामी नागरिकांनी नेहरू मेमोरियल सभागृहात गर्दी करण्याची आवश्यकता नाही. विजेत्यांना ई-मेल, लघुसंदेशांद्वारे माहिती पाठवण्यात येणार आहे’.
दरम्यान, पुणे, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्य़ांमधील ५६४७ सदनिकांसाठी ९० हजार अर्ज नागरिकांनी दाखल केले आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांत ५२१७ सदनिका आहेत. पंतप्रधान आवास योजना, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य, म्हाडाकडून बांधण्यात आलेले प्रकल्प आणि २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत या सदनिका स्वस्त दरात नागरिकांना उपलब्ध होणार आहेत.
युटय़ूबवर पाहा निकाल
नागरिकांना घरबसल्या निकाल पाहता येण्यासाठी म्हाडाकडून http://bit.ly/PuneLottery2021 हा युट्यूब दुवा उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच म्हाडाच्या संकेत स्थळावरही निकाल पाहण्याची सुविधा आहे.






















Join Our Whatsapp Group