पिंपरी (Pclive7.com):- शहरातील सर्वसामान्य नागरीकांनी मास्क परीधान केला नाही तर प्रशासनाकडून ५०० रुपये दंड आकारला जातो. मात्र आता एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना सर्व नियमांचे उल्लंघन शहराच्या प्रथम नागरीक असणा-या महापौर माई ढोरे यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्यावरदेखील सर्वसामान्य नागरीकांप्रमाणेच कारवाई करण्यात यावी, व नैतिक जबाबदारी स्वीकारुन त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या जेष्ठनेत्या मंगला कदम यांनी केली आहे.
यासंदर्भात मंगला कदम यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार व मनपा प्रशासन विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवित आहेत. त्याच बरोबर कोरोना टाळण्यासाठी मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स पाळणे व वारवांर हात धुणे याबाबत जनजागृती करत आहे. तसेच शहरातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपा प्रशासन व पोलिस प्रशासन शहरातील सर्व सामान्य जनतेवर कडक निर्बंध घातले आहे.
मास्क न वापरणा-या नागरीकांना ५०० रुपये दंड वसूल करण्यात येत आहे. लग्न, समारंभास मोजक्या नातेवाईकांसह करण्यास परवानगी दिली जात आहे. बंदिस्त सभागृहामध्ये क्षमतेपेक्षा फक्त ५० टक्केच उपस्थितांची संख्या ठेवण्याचे बंधन घालत आहे. तसेच सभागृहामध्ये मास्क घालणे अनिवार्य केले आहे. सोशल डिस्टंन्स पाळणे बंधनकारक केले आहे. सँनिटायझरची व्यवस्था, थर्मल गन असणे अनिवार्य केले आहे. तसेच मनपा प्रशासनाकडून कोविड सेंटर सज्ज ठेवण्याचे आदेश दिले गेले आहेत. एकच कोरोनाच्या दुस-या लाटेशी लढण्यासाठी राज्य सरकार, मनपा प्रशासन व पोलिस प्रशासन युध्द पातळीवर प्रयत्न करीत आहे.
एकीकडे अशी परिस्थिती असताना शहराच्या प्रथम नागरीक असलेल्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी काल आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये स्वत: महापौरांनीच कोरोना विषयक शासनाच्या आदेशाचा भंग केला. त्यांनी आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्यांच्यासह भाजपच्या एकाही पदाधिका-यांनी मास्क परीधान केला नाही, सभागृहामध्ये सोशल डिस्टंन्स न पाळता सभागृहाच्या क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झालेली होती. या कार्यक्रमास भाजपचे प्रमुख पदाधिकारीही उपस्थित होते.
परंतु एकाही पदाधिका-यांनी मास्क परीधान केला नव्हता. शहरात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी साहित्य खरेदीमध्ये भाजपने भष्ट्राचार केला व आता कोरोना प्रसार करण्यासही भाजपचे महापौर व पदाधिकारीही जबाबदार आहेत. शहरातील सर्वसामान्य नागरीकांना मास्क परीधान केला नाही तर त्याला मनपा प्रशासन ५०० रुपये दंड करते. आता शहराच्या प्रथम नागरीक असणा-या महापौर यांच्यावरदेखील सर्वसामान्य नागरीकांप्रमाणेच कारवाई करण्यात यावी. तसेच नैतिक जबाबदारी स्वीकारुन त्यांनी राजीनामा द्यावा. तसेच या कार्यक्रमात ज्या भाजपच्या नगरसदस्यांनी मास्क परीधान केला नव्हता त्यांच्यावरही कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी मंगला कदम यांनी केली आहे.






















Join Our Whatsapp Group