भोसरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेतील प्रत्येक पद सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांना महत्वाचे असते. यामुळे काही दिवसांपूर्वी सुरू असलेल्या स्थायी समितीच्या सभापती निवडणूकीवरून भाजपचे बिनविरोध नगरसेवक रवी लांडगे आणि शहर भाजपामधील राजकीय वाद झाला होता. शहरात सध्या ४० वर्षांपासून भाजपचे एकनिष्ठ असलेले स्व.अंकुश लांडगे आणि पिंपरी चिंचवड शहरात सत्तेत आलेल्या भाजपचे भोसरीचे बिनविरोध पहिले नगरसेवक रवी लांडगे यांनी केलेल्या फ्लेक्सबाजी करून पुन्हा हा वाद चव्हाट्यावर आणला आहे. सध्या भोसरी परिसरात या फ्लेक्सबाजीची चांगलीच चर्चा रंगली आहे.
स्थायी समितीच्या सभापतीपदाच्या रेसमध्ये रवी लांडगे यांचे नाव आघाडीवर होते. मात्र अचानकपणे नितीन लांडगे यांचे नाव जाहिर करण्यात आले. त्यामुळे रवी लांडगे यांनी तडकाफडकी स्थायी समितीच्या सदस्याचा राजीनामा देऊन टाकला. त्यामुळे भाजपातील राजकारण तापले होते.
भाजपाचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी शब्द देवूनही डावलल्याने रवी लांडगे यांनी आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. “गोरगरिबांसाठी बांधलेल्या रुग्णालयाच्या खासगीकरणाला मी विरोध केला, हे माझं चुकलं का”? “चाळीस वर्षांपासून आमचं कुटुंब भारतीय जनता पक्षाची सेवा करतंय हे आमच्या कुटुंबाचे चुकलं का”? “सोयीच राजकारण नाही तर स्वाभिमानी राजकारण अंगिकृत केले. हे माझं चुकलं का”? “माझ्या वडिलांनी शहरात भारतीय जनता पक्षाचा पाया रोवला. माझ्या चुलत्यांनी पक्षाचा विस्तार केला आणि मीही पक्षनिष्ठ राहिलो हे आमच्या कुटुंबाच चुकलं का”? असे प्रश्न विचारणारे फलक रवी लांडगे यांचे भोसरी मतदारसंघात झळकले आहेत.
दिघी, चऱ्होली, डुडुळगाव, मोशी, चिखली, भोसरी या भागात हे फलक आहेत. या फलकांवर भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे, बाबासाहेब लांडगे, अंकुशराव लांडगे यांचे छायाचित्र वापरले आहे. We Support Ravi Landge असे लिहिले असून भाजपचे चिन्ह कमळाचे छायाचित्र देखील आहे. या फलकांची भोसरी मतदारसंघात जोरदार चर्चा आहे.
माझे वडील 1986 आणि 1992 मध्ये भाजपच्या तिकिटावर महापालिकेवर निवडून आले होते. त्यानंतर 1997 मध्ये चुलते अंकुशराव लांडगे निवडून आले होते. त्यांनी भाजपच्या ‘रोपा’चा वटवृक्ष केला. अंकुश लांडगे यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आशा लांडगे महापालिकेवर निवडून आल्या. 2017 मध्ये मी बिनविरोध निवडून आलो. गेली 40 वर्षे आम्ही भाजपशी प्रामाणिकपणे, निष्ठेने काम करत आहोत. महापालिकेत सत्ता आल्यावर किमान सन्मानाचे पद मिळावे, अशी आमची इच्छा होती. परंतु, पक्षात जुन्या, निष्ठावान कार्यकर्त्यांचे खच्चीकरण सुरू आहे, असाल्याचा आरोपही रवी यांनी पत्रकार परिषदेत केला होता.






















Join Our Whatsapp Group