नाशिक (Pclive7.com):- राज्यात एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असून गंभीर परिस्थिती असतानाच नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती झाल्याचा प्रकार समोर आला आहे. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीतून गळती झाल्याने २२ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. रुग्णालयातील काही रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आलं आहे.
नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन टाकीतून गळती झाली होती. ऑक्सिजन टँकरमधून टाकीत भरला जात असताना ही गळती सुरु झाली. टाकीमधील गळती रोखण्यासाठी तसंच दुरुस्तीसाठी रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झालं होतं.
नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. रुग्णालयात १५० रुग्ण होते, यापैकी २३ रुग्ण व्हेंटिलेटर आणि इतर रुग्ण ऑक्सिजनवर आहेत असं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करु असं सांगितलं आहे. दरम्यान विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मनपा आयुक्तच यासाठी जबाबदार असून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर रुग्णालयात मोठी गर्दी होत असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. करोनाच्या नियमांचं उल्लंघन होऊ नये यासाठी पोलीस गर्दी कमी करत आहेत. याशिवाय संपूर्ण घटनेची माहिती घेत आहेत. तसंच नातेवाईकांच्या भावनांचा उद्रेक होऊन परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.