पिंपरी (Pclive7.com):- राज्यात कोरोनासोबतच म्युकर मायकोसिस या बुरशीजन्य आजाराने डोके वर काढले आहे. गंभीर बाब म्हणजे पिंपरी चिंचवड शहरातही या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. तसेच काही मृत्यूदेखील या आजारामुळे झाले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने तातडीने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व रुग्णालयांमध्ये म्युकर मायकोसिसच्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष उभारावेत, अशी मागणी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केली आहे.
यासंदर्भात नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना मेलद्वारे निवेदन दिले आहे.
या निवेदनात नगरसेवक वाघेरे यांनी म्हंटले आहे की, कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका असणार्या व्यक्तींना म्हणजेच ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, किडनीसारखे आजार असलेल्या नागरिकांना म्युकर मायकोसिस या आजाराचा त्रास होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्यामध्ये कोविड आजारातून बरे झालेल्या काही रुग्णांमध्ये डोळे, नाक व तोंडाच्या इन्फेक्शनच्या तक्रारीमध्ये वाढ झाली आहे. बुरशीमुळे होणार्या संसर्गामुळे अनेक नागरिकांच्या मनामध्ये या आजाराबाबत चिंता निर्माण झाली आहे. अनेक रुग्णांना या आजारामुळे आपले डोळे गमवावे लागले आहे. तज्ञांच्या मते म्युकर मायकॉसिसवर योग्यवेळी उपचार झाले नाही. तर संसर्ग शरीरातील इतर अवयव व मेंदू तसेच फुफ्फुसापर्यंत पोहचला तर रूग्णाला मेंदूत संसर्ग होऊन मृत्यू होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही.यासर्व गोष्टी टाळण्याकरिता वेळीच उपचार होणे गरजेचे आहे.
या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून वाय.सी.एम.रुग्णालय तसेच अन्य मनपा रुग्णालयामध्ये म्युकर मायकॉसिस आजारासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्याचे निर्देश संबंधित विभागास त्वरित देण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक वाघेरे यांनी यावेळी केली.






















Join Our Whatsapp Group