पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहराची स्वतंत्र ओळख निर्माण करणे व शहर परिवर्तन यासाठी ‘पॅलेडियम कन्सल्टींग’ या संस्थेची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या संस्थेसाठी महापालिकेने ११ कोटी रुपये मोजले आहेत. परंतु, या साडेतीन वर्षाच्या कालावधीत या संस्थेने कोणते नियोजन केले आणि त्यामुळे पिंपरी चिंचवड शहराचे कसे परिवर्तन झाले, तसेच पॅलेडियम या संस्थेने केलेल्या कामाचा सविस्तर अहवाल सादर करण्यात यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी केली आहे.
याबाबत आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात मिसाळ यांनी म्हटले आहे की, महापालिकेच्या वतीने शहराची स्वतंत्र ओळख निर्माण करणे, नागरिकांची जीवनशैली उंचावण्यासाठी शहर परीवर्तन कार्यालय (सीटीओ) हा उपक्रम राबविला आहे. त्यासाठी पॅलेडियम कन्सल्टींग या संस्थेची सल्लागार म्हणून दोन वर्षांसाठी नियक्ती करण्यात आली होती. पुढे त्यांना दीड वर्षे मुदतवाढ देण्यात आली.
या संस्थेने पिंपरी चिंचवड शहरासाठी सर्वंकष शहर परिवर्तन आराखडा तयार करणे अपेक्षित होते. या संस्थेसाठी सुमारे ११ कोटी रुपये मोजले आहेत. परंतु, या साडेतीन वर्षाच्या कालावधीत या संस्थेने कोणते नियोजन केले आणि त्यामुळे शहराचे कसे परीवर्तन झाले हे शहरात कुठेही दिसून येत नाही.
ही संस्था कार्यरत असतानाही पाणी पुरवठा प्रकल्प, अमृत योजना, स्वच्छ भारत अभियान इत्यादी प्रकल्प रखडलेले आहेत. वस्तुत: पर्यावरण, पर्यटनपूरक शहर करण्याचा उद्देश शहर परीवर्तन कार्यालयाचा होता. परंतु, यापैकी कोणतेही ठोस काम झालेले नाही. त्यामुळे या सल्लागार संस्थेवर केलेला खर्च वाया गेला आहे.
जनतेच्या पैश्याचा अश्या रीतीने अपव्यय व्हावा ह्यासारखी दुर्दैवी बाब नाही. सामान्य जनतेचा कररुपी पैसा हा त्यांच्या कल्याणासाठीच खर्च व्हावा ही माफक अपेक्षा आहे. परंतु, २०१७ नंतर महापालिकेमध्ये बाह्य सल्लागाराची प्रचंड प्रमाणात नेमणूक झाली आहे.
महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता असताना आयुक्तांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून/कर्मचाऱ्यांकडून यशस्वीरीत्या कामे करवून घेतली. स्मार्ट सिटी सारखे पुरस्कार देखील पिंपरी चिंचवडला मिळवून दिले. परंतु, २०१७ पासून ज्याप्रमाणात बाह्य सल्लागारांची नेमणूक होत आहे. त्यावरून महापालिकेने नियुक्त केलेले अधिकारी/कर्मचारी काम करण्यास लायक नाहीत का? किंवा बाह्य सल्लागार नेमण्यामागे अजून काही हेतू असावा, असेही मिसाळ यांनी म्हटले आहे.






















Join Our Whatsapp Group