पिंपरी (Pclive7.com):- पूर्ववैमनस्यातून तीन जणांनी मिळून एकाचा कोयत्याने वार करीत खून केला. ही घटना थेरगाव येथे रविवारी (दि.६) रात्री घडली. याप्रकरणी तीनही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
पंकज धोत्रे (रा. थेरगाव) असे खून झालेल्या इसमाचे नाव असून त्याच्यावर देखील गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
वैभव गायकवाड, प्रथमेश शिंदे आणि मंथन चव्हाण अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत पंकज धोत्रे आणि आरोपी याच्यात पूर्वी भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून आरोपी गेल्या दोन-तीन दिवसांपासून पंकज याला शोधत होते.
रविवारी रात्री सव्वा आठ वाजताच्या सुमारास थेरगाव येथील सोळा नंबर बसस्टॉप येथे पंकज दिसला. आरोपींनी त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. यामध्ये पंकज हा गंभीर जखमी झाला. त्यास उपचारासाठी खासगी रुग्णालयात दखल केले.
मात्र उपचार सुरू असताना रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी तातडीने आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली. वाकड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.






















Join Our Whatsapp Group