पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांनी पती आणि भावाच्या नावाने पिंपरी चिंचवड महापालिकेत ठेकेदारी केल्याचा आरोप करून याप्रकरणी त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी शिवसेनेचे युवा नेते आणि माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. तथापि, ननावरे सर्वांची दिशाभूल करत असल्याचे स्पष्टीकरण शिलवंत यांनी दिले आहे.
शिलवंत यांनी ठेकेदारीच्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळवला आहे. पती आणि भावाच्या कंपनीमार्फत त्यांनी महापालिकेला एक लाख मास्कचा पुरवठा करून महापालिकेकडून १० लाख रुपये घेतले होते. महापालिका अधिनियमानुसार नगरसेवकांना कोणत्याही निविदा प्रक्रियेत सहभागी होता येत नाही. तसेच ठेकेदारी करता येत नाही आणि केल्यास त्यांचे पद रद्द होऊ शकते. या कायद्यानुसार त्यांचे पद रद्द करावे, अशी मागणी जितेंद्र ननावरे यांनी केलीयं.
नगरसेविका शीलवंत यांनी ननावरे यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ननावरे यांच्या पत्नी प्रियंका माझ्या विरोधात पराभूत झाल्या आहेत. तो पराभव त्यांच्या जिव्हारी लागला असल्याने ते बिनबुडाचे आरोप करत आहेत. ननावरे खोटी माहिती देऊन सर्वांची दिशाभूल करत आहेत.
विभागीय आयुक्तांनी हा विषय केव्हाच निकाली काढलेला आहे. महापालिका आयुक्तांना यापूर्वीच खुलासा दिलेला आहे. तरीही अपुऱ्या अभ्यासातून, कोणतीही शहानिशा न करता ननावरे यांनी केलेले आरोप नाटकी आणि भंपक आहेत, असे शिलवंत यांनी सांगितले.