पिंपरी (Pclive7.com):- कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना तडीपार आरोपीने कोयता दाखवून ‘आज पंगा नाही घ्यायचा, नाहीतर विकेट’ अशी धमकी दिली. ही घटना रविवारी (दि.३) रात्री पिंपरीगाव येथे घडली.
अतुल उर्फ चांड्या अविनाश पवार (२८, रा. मिलिंदनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस नाईक शहाजी धायगुडे यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अतुल याला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. मात्र, तरीदेखील तो शहरात वावरत असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार, फिर्यादी आणि त्यांचे सहकारी पोलिस त्याच्यावर कारवाई करण्यासाठी गेले. त्यावेळी अतुलने कोयता दाखवून पोलिसांसोबत झटापटी केली. तसेच, ‘आज पंगा नाही घ्यायचा, नाहीतर विकेट’ असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र, तरीही पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
त्यानंतर ‘आज दिवस तुमचा आहे. उद्या काय करणार तुम्हाला मीच पुरा पडणार’ असे म्हणून अतुलने शिवीगाळ करून पोलिसांशी हुज्जत घातली. असे फिर्यादीत नमूद आहे. सहायक पोलिस निरीक्षक कदम तपास करीत आहेत.
पोलिसाची पकडली कॉलर
हर्षल उर्फ गबऱ्या रामदास पवार (२८, रा. नेहरूनगर, पिंपरी) यालादेखील दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. मात्र, तोसुद्धा शहरातच वावरत होता. याची माहिती मिळाल्यानंतर कारवाईसाठी नेहरुनगर येथे गेलेल्या पोलिसांची कॉलर पकडून त्यानेही झटापटी केली. तसेच पोलिस शिपाई विकास रेड्डी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.





















Join Our Whatsapp Group