पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवडमधील डॉ. डी. वाय पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ४७ मुलांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. त्यानंतर एकाही मुलाला कोणताही त्रास झालेला नाही, असा दावा हॉस्पिटलने केला आहे.
डॉ. डी. वाय पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या डॉ. शलाका आगरखेडकर यांनी सांगितले की, १२ ते १८ या वयोगटातील मुलांना ही लस दिली आहे. या लसीचे २८ दिवसांच्या अंतराने तीन डोस द्यावे लागतात. मार्चपासून ही लस देणे सुरू केले होते, तर २६ ऑगस्टपर्यंत या ४७ मुलांचे तिन्ही डोस पूर्ण झाले आहेत.
कोणतीही लस घेतली की मुलांना जो त्रास होतो, तसा कोणताही त्रास लस दिल्यावर झालेला नाही. मुलांना लस देण्यापूर्वी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या होत्या. तसेच पालकांची संमतीदेखील घेण्यात आली होती. ज्या मुलांना ही लस देण्यात आली त्यांना कोरोना झालेला नसावा, अशी अट होती.
दरम्यान, लहान मुलांच्या दृष्टीने आनंदाची बातमी आहे. देशभरातील लहानग्यांवर कोरोना लसीची चाचणी पार पडली आहे. त्यामुळे येत्या महिन्याभरातच लहान मुलांच्या लसीकरणाला देखील सुरुवात होण्याची शक्यता आहे. झायकोव्ह डी नावाची ही लस असून, अहमदाबादच्या झायडस कॅडीला कंपनीने याची निर्मिती केली आहे. लवकरच लहान मुलांसाठी लसीकरण होणार आहे.






















Join Our Whatsapp Group