पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा नवीन विषाणू असलेल्या ‘ओमायक्रॉन’चा संसर्ग झालेले ४ नवीन रुग्ण आज (दि.२९) सापडले आहेत. त्यामध्ये २ महिला, १ पुरूष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण महापालिकेच्या नवीन भोसरी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकिय विभागाकडून देण्यात आली आहे.
आज आलेल्या ४ रूग्णांपैकी १ रूग्ण थायलंड, १ रूग्ण जपान, १ रूग्ण दक्षिण आफ्रिका येथून आलेले आहेत. तसेच एक रूग्ण रॅंन्डम तपासणीत ओमायक्राँन पॉझिटिव्ह आलेला आहे. या सर्व रूग्णांची प्रकृती स्थिर आहे. शहरात आजपर्यंत ओमायक्राँनचे २२ रूग्ण आढळले आहेत.
आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ओमायक्रॉन या नव्या उत्परिवर्तित विषाणूचा प्रादुर्भाव होत आहे. केंद्र व राज्य शासनाने खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सूचित केले आहे. त्यानुसार महापालिकेकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटच्या अनुषंगाने महापालिकेतर्फे तपासणी मोहीम सुरू आहे.
आज (दि.२९) ओमायक्रॉनचा संसर्ग झालेले ४ नवीन रूग्ण सापडले आहेत. त्यामध्ये २ महिला, १ पुरूष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण महापालिकेच्या नवीन भोसरी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
एकूण ५८ कोविड-१९ पॉझिटीव्ह रुग्णांपैकी ४२ रुग्णांची पुन्हा १० व्या दिवशी कोविड-१९ तपासणी करण्यात आली असता कोविड-१९ तपासणीचा अहवाल नकारात्मक आला असुन सदर रुग्णांना घरी सोडुन गृहविलगीकरणात ठेवण्यात आलेले आहे. उर्वरित परदेशी प्रवाश्यांची कोविड 19 तपासणी करण्याचे कामकाज चालू आहे.