पिंपरी (Pclive7.com):- मोहननगर येथील पंतप्रधान आवास योजनेत स्थानिक रस्ता बाधितांना घरे राखीव ठेवावीत अशी मागणी शिवसेना नगरसेविका मीनल यादव यांनी केली आहे.
यासंदर्भात मीनल यादव आणि शिवसेना विभागप्रमुख विशाल यादव यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, मोहननगर परिसरामध्ये पंतप्रधान आवास योजने अंतर्गत गृह प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे.
या प्रकल्पामध्ये मोहननगर येथील अनेक वर्षापासून रस्ता रुंदीकरण, महापालिकेच्या आरक्षित जागेमुळे अनेक लोक बाधीत झाले. त्यांची निवासी घरे गेलीत. अश्या अनेक बाधितांनी घरकुल, म्हाडा, पंतप्रधान आवास योजना यामध्ये घरे मिळण्यासाठी अर्ज केलेत. मात्र, ते घरापासून वंचित आहेत.
या सर्व बाधितांना मोहननगरमध्ये होणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेत घरे राखीव ठेवावीत. त्यामुळे त्यांना हक्काची घरे मिळतील अशी मागणी नगरसेविका मीनल यादव यांनी केली आहे.