राष्ट्रवादीची मदार भाजपामधील नाराज अन् शिवसेनेतील मातब्बर नेत्यांवर; पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना उद्या होणार जाहीर
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी तीन सदस्यीय प्रभाग रचना उद्या (दि.१ फेब्रुवारी) जाहीर होत आहे. मात्र, या प्रभाग रचनेवर सत्ताधारी भाजपाच्या दोन्ही आमदारांचा बोलबाला असून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना पर्यायाने महाविकास आघाडीला राज्यातील सत्तेत असतानाही ‘बॅकफुट’वर रहावे लागले आहे, अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. परिणामी, राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या निवडणुकीत आता राष्ट्रवादीला भाजपामधील नाराज आणि शिवसेनेतील इच्छुकांच्या भरोवशावर निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. अन्थया ‘मॅजिक फिगर’ पर्यंतचा प्रवास खडतर होणार आहेच.
उलटपक्षी, सध्यस्थितीला असलेले ३६ इतके संख्याबळ कायम ठेवणे आव्हानात्मक आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी अगोदर प्रभाग रचना जाहीर होणार असून आरक्षण सोडत नंतर काढली जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून दोन-तीन दिवसांत प्रारुप प्रभाग रचनेस मान्यता मिळेल. त्यानंतर महापालिकेकडून प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे सर्वांचे प्रभाग रचनेकडे लक्ष लागले आहे.
महापालिका निवडणुकीसाठी प्रभागरचना आणि आरक्षण सोडत एकाच दिवशी जाहीर केली जाते. परंतु, ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीची प्रक्रिया थंडावली होती. ओबीसींच्या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना अगोदर जाहीर करण्याचा निर्णय घेतला असून आरक्षण सोडत नंतर काढली जाणार आहे. त्याबाबतचा निर्णय निवडणूक आयुक्त यु.पी.एस मदान यांनी घेतला आहे.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकीय पटलावर गेल्या तीन महिन्यांपासून प्रभाग रचना आणि संभाव्य उमेदवारांबाबत खलबते सुरू आहेत. राज्यात सत्ताधारी असतानाही राष्ट्रवादी आणि शिवसेनेला अनुकूल प्रभाग रचना करता आली नाही. दोन सदस्य प्रभाग पद्धती राष्ट्रवादीसाठी हिताची असताना पुन्हा तीन सदस्य प्रभाग पद्धती करण्यात आली. ओबीसी आरक्षण आणि महाविकास आघाडी की स्वबळाचा नारा यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेत निर्णय झालेला नाही. या सर्व घडमोडींनंतर भाजपा मात्र स्थानिक पातळीवर ताकद वाढवून हेतू साध्य करीत असताना दिसत आहे.
राष्ट्रवादीतील ‘चाणक्य’भाजपाच्या रिमोटवर..?
राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी प्रमुख घटकपक्ष आहे. त्यामुळे शहरातील भोसरी, पिंपरी आणि चिंचवडमधील स्थानिक तीन ते चार नेत्यांना प्रभाग रचना करताना प्रशासनाने विश्वासात घ्यावे, अशा सूचना प्रदेशपातळीवरुन दिल्या होत्या. शिवसेना आणि काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना प्रभाग रचना करताना विचारातही घेतले नाही, अशी चर्चा आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादीत राहून भाजपाला मदत करणाऱ्या काही लोकांच्या मदतीने भाजपाच्या आमदारांनी आपल्याला हवी तशी प्रभाग रचना आपल्या हस्तकांमार्फत करुन घेतली आहे. किंबहुना, आमदारांना अपेक्षीत असलेले ‘इनपूट’ निवडणूक अधिकाऱ्यांपर्यंत सोईस्कर पोहोचवले आहेत. विशेष म्हणजे, भाजपाच्या आमदारांना अपेक्षित असलेल्या प्रभाग रचना विशिष्ट नगरसेवकांना डोळ्यांसमोर ठेवून केली असून, त्यामध्ये भाजपा-राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी अडजेस्टमेंट केली आहे, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. दोन्ही आमदारांचे काही जवळचे मित्र, नातेवाईक आणि हितचिंतक राष्ट्रवादीत आहेत. त्यामुळे आमदारांच्या ‘इनपूट’वर राष्ट्रवादीचा कारभार चाललेला आहे.
आमदारांच्या कार्यालयात संभाव्य प्रभागांचा आराखाडा…?
सत्ताधारी भाजपाचे महापालिकेतील संख्याबळ सध्यस्थितीला ७७ इतके आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ३६, शिवसेनेचे ९, अपक्ष ५ आणि मनसेचे १ अशी एकूण १२८ सदस्य संख्या आहे. यापैकी चार नगरसेवकांना मृत्यू झाला आहे. पोटनिवडणूक न झाल्यामुळे चारही नगरसेवकांची पदे रिक्त आहेत. त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार, आगामी निवडणुकीत सदस्य संख्या वाढणार आहे. संभाव्य प्रभाग रचनेचा मसुदा भाजपाच्या दोन्ही आमदारांच्या कार्यालयात गेल्या दोन महिन्यांपासूनच उपलब्ध होता. भाजपाच्या संभाव्य उमेदवारांना डोळ्यांसमोर ठेवून प्रभाग रचना निश्चित करण्यात आली. तसा आराखडा आपल्या राष्ट्रवादीतील मित्रांद्वारे निवडणूक अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आला आहे, अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. या सर्व रणनितीमध्ये भाजपा यशस्वी झाल्यास आगामी निवडणुकीत भाजपाचे पारडे निश्चितपणे जड राहील, यात शंका नाही.
राष्ट्रवादीने स्वत:च्या हिंमतीवर निवडणूक लढवावी..!
गेल्या सहा महिन्यांपासून भाजपाला खिंडार पडणार, १५ ते २० नगरसेवक भाजपाला सोडचिठ्ठी देणार… अशा चर्चेचा धुरळा उडाला होता. पण, अद्याप एकही प्रवेश झालेला नाही. उद्या प्रभाग रचना प्रसिद्ध होईल. त्यानंतर हरकती आणि सूचना होतील. अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध होईल. त्यानंतर ओबीसी आरक्षणाचा निकाल काय लागतो? याकडे लक्ष राहील. यानंतर भाजपा उमेदवारी फायनल करेल. त्यामुळे भाजपातील मोठा गट राष्ट्रवादीत येणार…असा स्थानिक राष्ट्रवादीचा दावा फोल ठरण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, शेवटच्या १५ दिवसांत भाजपाकडून उमेदवारी न मिळालेले नगरसेवक राष्ट्रवादीत दाखल होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील काही ज्येष्ठ नगरसेवकांनी कनिष्ठ नगरसेवकांचा पत्ता कट केला आहे, तर काही जुनिअर नगरसेवकांनी ज्येष्ठांना कात्रजचा घाट दाखवला आहे. त्यामुळे स्थानिक राष्ट्रवादीतील अंतर्गत खदखद वाढली असून, त्याचा फायदा भाजपाने पुरेपूर उठवला आहे.
शिवसेना, काँग्रेसचे पानीपत होणार.?
गेल्या निवडणुकीत २०१७ मध्ये काँग्रेस आणि शिवसेनेने शहरात स्वबळावर निवडणूक लढवली होती. सुमारे १०० जागा लढवलेल्या शिवसेनेला केवळ ९ जागांवर यश मिळवता आले आहे. तर काँग्रेसला आपला भोपळाही फोडता आला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने यापूर्वी शहरातील सत्ताधारी असलेल्या काँग्रेसचे पुरते पानीपत केले. काँग्रेस शहरातून हद्दपार झाली. आता भाजपा शिवसेनेचा बंदोबस्त करीत आहे. शिवसेनेतील ४ ते ५ नगरसेवक भाजपाच्या वाटेवर आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीतून शिवसेनाला शहरातून हद्दपार करण्यासाठी स्थानिक भाजपा राष्ट्रवादीच्या मदतीने ‘करेक्ट कार्यक्रम ’करीत आहे. याबाबत शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील काय भूमिका घेतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. विशेष म्हणजे, १३९ जागांमधील अवघ्या १० ते १२ जागांवर शिवसेनेचा उमेदवार निवडून येईल, अशा नियोजनाने प्रभाग रचना बनवण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.