पिंपरी (Pclive7.com):- साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे महामंडळास वाढीव १ हजार कोटी रुपयांचे भाग भांडवल राज्य शासनाने त्वरित द्यावे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महामंडळाचे माजी अध्यक्ष, भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी दिला.

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठविले आहे. त्यात गोरखे यांनी म्हटले आहे की, साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळास भागभांडवल अत्यंत तुटपूंजे आहे. अनेक दिवस महामंडळ बंद अवस्थेत असल्याने मागील अनेक वर्षांचे भागभांडवल वायाच गेले आहे. या अनुषंगाने महामंडळास १ हजार कोटी रुपयांचे भाग भांडवल त्वरित महामंडळाला देऊन महामंडळ ताबडतोब चालू करावे.

राज्य सरकारकडून मिळणाऱ्या भागभांडवला मधून १ लाख ते ५ लाख रुपये पर्यंतची थेट कर्ज योजना तात्काळ सुरू करावी. बीजभांडवल कर्ज योजनेची मर्यादा ७ लाख रुपयांवरून १० लाख रुपयापर्यंत करण्यात यावी. त्या मध्ये महामंडळाचा हिस्सा २०% ऐवजी ४५% इतका व बँक कर्ज ५०% तसेच, लाभार्थी हिस्सा ५% असा करून तात्काळ शासन निर्णय काढून योजना पूर्ववत सुरू करावी.
अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या धर्तीवर १० लाख रुपये पर्यंतची व्याज परतावा योजना या महामंडळास तात्काळ सुरू करावी. अन्यथा महाराष्ट्र भर समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अमित गोरखे यांनी पत्रातून दिला आहे.






















Join Our Whatsapp Group