पुणे (Pclive7.com):- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आजपासून (४ मार्च) सुरू होत आहे. करोना प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी परीक्षा केंद्रे वाढवण्यात आली असून, परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथके, महिला पथकांची स्थापना करण्यात आल्याची माहिती राज्य मंडळाने दिली.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत. अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करावा लागला होता. त्यामुळे दहावी आणि बारावीचे अभूतपूर्व निकाल जाहीर झाले होते. या पार्श्वभूमीवर यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षांकडे लक्ष लागले होते. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन योग्य पद्धतीने होण्यासाठी प्रत्यक्ष परीक्षेला पर्याय नसल्याची भूमिका शिक्षण क्षेत्रातून मांडली जात होती. काही दिवसांपूर्वी प्रत्यक्ष परीक्षेच्या विरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलने झाली होती. परीक्षेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर परीक्षांचा मार्ग मोकळा झाला. या पार्श्वभूमीवर आता बारावीची परीक्षा शुक्रवारपासून सुरू होत आहे.
राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रावर करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. गणित, पुस्तकपालन आणि लेखाकर्म, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांच्या परीक्षांवेळीच विद्यार्थ्यांना गणकयंत्राचा वापर करता येईल. मोबाइल किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षा कक्षात नेता येणार नाही. विद्यार्थ्यांनी केवळ मंडळाने प्रसिद्ध केलेलेच वेळापत्रक ग्राह्य धरावे.
शाखानिहाय विद्यार्थी-
- विज्ञान – ६ लाख ३२,९९४
- कला – ४ लाख ३७,३३६
- वाणिज्य – ३ लाख ६४,३६२
- व्यावसायिक अभ्यासक्रम – ५० हजार २०२
- तंत्रशास्त्र – ९३२
एकूण परीक्षा केंद्रे – ९ हजार ६३५ (२ हजार ९९६ मुख्य केंद्रे, ६ हजार ६३९ उपकेंद्रे)
परीक्षा अर्ज भरलेले विद्यार्थी – १४ लाख ८५ हजार ८२६ (८ लाख १७ हजार ६११ विद्यार्थी, ६ लाख ६८ हजार ८८ विद्यार्थिनी)
- तांत्रिक कारणामुळे ५ आणि ७ मार्चला होणारी परीक्षा अनुक्रमे ५ एप्रिल आणि ७ एप्रिलला ७० ते १०० गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी ३० मिनिटे जादा वेळ
- ४० ते ६० गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी १५ मिनिटे जादा वेळ
- परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथके, महिलांची विशेष पथके स्थापन, परीक्षा केंद्रांचे चित्रीकरण
- विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान तणावाबाबत मार्गदर्शनासाठी समुपदेशकांची नियुक्ती
























Join Our Whatsapp Group