पिंपरी (Pclive7.com):- पाळीव प्राण्यांसाठी महापालिकेच्या वतीने नेहरूनगर येथे हाऊस उभारण्यात आले असून याचे काम पूर्ण झाले आहे. येत्या आठवड्याभरात पक्षी – पक्ष्यांच्या शस्त्रक्रियांनाही सुरूवात होणार आहे. महापालिकेने उभारलेले हे राज्यातील पहिले शेल्टर हाऊस असल्याचा दावा पशू वैद्यकीय विभागाने केला आहे.
शहरात अनेक पशू – प्राणी प्रेमी नागरिक आहेत. अनेक नागरिकांकडे कुत्रा, मांजर, ससा असे प्राणी आहेत. प्राणी, पक्षावर उपचार करण्यासाठी महापालिकेचा पिंपरीत एकमेव वैद्यकीय दवाखाना आहे. या दवाखान्यात प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे नेहरूनगर येथील डॉकपाऊड येथे शेल्टर हाऊस उभारण्यात आले आहे.
या शेल्टर हाऊसचे काम पूर्ण झाले असून याठिकाणी ओपीडी (बाह्य रूग्ण विभाग) आणि आयपीडी (अंतर रुग्ण विभाग) हे दोन्ही विभाग सुरू होणार आहेत. या शेल्टर हाऊसमध्ये कुत्रा, मांजर, पशू-पक्षी यांच्यावर उपचार आणि सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शेल्टरमधील प्राण्यांसाठी औषधांची गरज आहे. औषध खरेदीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
महापालिकेने उभारलेले हे राज्यातील पहिलेच शेल्टर हाऊस आहे. हे हाऊस सर्व सेवा सुविधांनी सज्ज असणार आहे. या हाऊसमध्ये पशू पक्ष्यांच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया होणार आहेत.
– निलेश देशमुख, सहायक आयुक्त पशू वैद्यकीय विभाग