पिंपरी (Pclive7.com):- ओबीसी आरक्षणामुळे निवडणुका लांबल्या आहेत. असे असताना गेल्या दोन दिवसांपासून सोशल माध्यमावर सार्वत्रिक निवडणुकीचे वेळापत्रक फिरू लागले आहे. या अफवांमुळे नव्याने चर्चांना वेग आला आणि इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या. रविवारी पालिकेला सुट्टी असल्याने तातडीने हा मेसेज अफवा असल्याबाबतचे स्पष्टीकरण लवकर झाले नाही, तोपर्यंत ही अफवा लाखो नागरिकांच्या मोबाइलवर जाऊन धडकली.

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत अशी भूमिका सरकारसह विरोधकांनीही घेतली. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने तसा ठराव विधीमंडळात मांडला. त्याला सत्ताधारी व विरोधकांनी एकमताने मंजुरी दिली. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील त्यावर स्वाक्षरीची मोहोर उमटविली. त्यामुळे या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले आहे. सद्यस्थितीत या विधेयकावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे. मात्र अद्याप यावर सुनावणी झाली नाही. असे असताना सोशल मीडियावर निवडणुकीच्या वेळापत्रक व्हायरल झाले आहे.
व्हायरल संदेशामध्ये १५ एप्रिलला निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. तर २९ एप्रिलला बॉर्डरचनेची आरक्षण सोडत होणार आहे. १ ते ५ मे या दरम्यान आक्षेप ५ दाखल करणे. १० ते १७ मे ला नामांकन दाखल करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. २० मे ला नामांकन अर्ज छाननी होणार आहे. २० मेला नामांकन मागे घेण्याची शेवटची संधी असणार आहे. तर ५ जूनला मतदान होऊन १० जूनला निकाल लागणार असल्याचे व्हायरल संदेशामध्ये सांगण्यात आले आहे. या व्हायरल संदेशामुळे इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. हा संदेश व्हायरल झाल्यापासून इच्छुकांकडून पुन्हा जोरदार तयारी सुरू झाली आहे. मात्र, हा संदेश खोटा असून राज्य निवडणूक आयोगाकडून अद्याप काहीही आदेश आले नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
निवडणूक आयोगाकडून अद्याप काहीही आदेश आलेले नाही..!सोशल मिडियावर व्हायरल होणारे निवडणुकीचे वेळापत्रक बनावट आहे. नागरिकांनी ते ग्राह्य धरू नये. तसेच पुढे फॉरवर्ड करू नये, हा संदेश खोटा असून निवडणुकीबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नाही.– बाळासाहेब खांडेकर, सहायक आयुक्त, निवडणूक विभाग.





















Join Our Whatsapp Group