पिंपरी (Pclive7.com):- राज्यातील वाढत्या बेरोजगारीच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी झुरळं जनता पार्टीच्या वतीने शनिवारी (दि. 6 जून) पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ‘बेरोजगार एल्गार’ धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे आंदोलन झाले असून याबाबतची पूर्वसूचना आणि 10 प्रमुख मागण्यांचे निवेदन हवेली तालुक्याच्या तहसीलदारांना देण्यात आले आहे.

झुरळं जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी सांगितले की, पेपरफुटी, रखडलेल्या भरती प्रक्रिया आणि वाढती बेरोजगारी यामुळे हजारो तरुणांचे भविष्य अंधारात गेले आहे. अनेक उमेदवारांचे वयोमर्यादेमुळे नुकसान होत असून शासनाने या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

या आंदोलनातून पेपरफुटी प्रकरणांतील दोषींवर कठोर कारवाई, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा, MCOCA अंतर्गत गुन्हे दाखल करून कठोर शिक्षा, केंद्र व राज्य शासनातील रिक्त पदे सहा महिन्यांत भरणे, 18 ते 35 वयोगटातील बेरोजगारांना दरमहा पाच हजार रुपये भत्ता, स्पर्धा परीक्षांची फी माफ करणे, कंत्राटी भरती बंद करून कायमस्वरूपी नोकरभरती, भरती प्रक्रियेतील घोटाळ्यांसाठी 24×7 हेल्पलाईन, मोफत कौशल्य प्रशिक्षण व नोकरीची हमी आणि आंदोलनकर्त्यांना संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.
हे आंदोलन पूर्णपणे शांततामय आणि कायद्याचे पालन करून करण्यात आले. बेरोजगार तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही झुरळं जनता पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे. “नोकरी नाही तर मतदान नाही” हा नारा देत तरुणांच्या हक्कासाठी हा लढा उभारण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.




















Join Our Whatsapp Group