अयोध्या (Pclive7.com):- ‘असली आ रहा है, नकली से सावधान‘ अशा स्वरुपाचे पोस्टर्स, होर्डिंग्ज सध्या अयोध्येत चर्चेचा विषय ठरले आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यापूर्वी शिवसैनिकांतर्फे असे पोस्टर्स थेट अयोध्येत लावण्यात आले आहेत. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आदित्य ठाकरे हे अयोध्येचा दौरा करणार आहेत.

तर त्यांच्यानंतर 5 जूनला मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेही अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. भोंग्यांच्या मुद्द्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला दिलेल्या आव्हानानंतर, आता अयोध्येत असली आणि नकलीचे पोस्टर्स शिवसेनेकडून लावण्यात आले आहेत. यानिमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टार्गेट करण्याचा शिवसेना प्रयत्न आहे.
मनसेकडूनही जोरदार प्रत्युत्तर
शिवसेनेने अयोध्येत होर्डिंग्जच्या माध्यमातून राज ठाकरेंवर साधलेल्या निशाण्याला मनसेतून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. कोण असली आणि कोण नकली आहे, हे सारा देश पाहत असल्याची टीका मनसे दादरचे विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी केली आहे. शिवसेनेने हिरवा हातात घेतला आहे आणि सत्तेसाठी हिंदुत्वाला लाथाडले आहे. अशी टीका किल्लेदार यांनी केली आहे.
आम्हाला डिवचू नका– मनसे
मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसली आहे. त्यामुळे शिवसेनेचं हिंदुत्व हे नकली आहे, राज ठाकरेंचे हिंदुत्व हे सोन्यासारखं अस्सल असल्याचं उत्तर मनसेकडून देण्यात आलं आहे. त्यामुळे कोण असली आणि कोण नकली, हे शिवसेनेनं ठरवू नये, महाराष्ट्रातील आणि देशातील जनता ते ठरवेल, उगाच आम्हाला डिवचू नका, असा इशाराही मनसेनं दिला आहे.






















Join Our Whatsapp Group