९२४ सदनिकांची होणार निर्मिती : लाभार्थींकडून प्रकल्पाचे स्वागत
पिंपरी (Pclive7.com):- झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून भोसरी-खंडेवस्ती येथील झोपडपट्टीचे पुनर्वसन होणार आहे. यासाठी पुढाकार घेतला जात आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘स्मार्ट सिटी’ घडत असतानाच शहरात सुरू असलेल्या ‘एसआरए’ प्रकल्प सामान्य नागरिकांची जीवनशैली सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

महाराष्ट्रात डिसेंबर १९९५ च्या विधानसभा अधिवेशनामध्ये महाराष्ट्र शासनाने अफझूलपूरकर समितीच्या शिफारशी मान्य करुन महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ मध्ये दुरूस्ती केली. त्याआधारे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर सदस्यांचा समावेश असलेले झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण स्थापन करण्यात आले.
वास्तविक, पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे ३० लाखांच्या घरात आहे. यापैकी १४.७८ टक्के लोकसंख्या झोपडपट्टीत वास्तव्य करते. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी धोरणानुसार झोपडपट्टी वासियांना आवश्यक त्या सोयी सुविधा युक्त मोफत घर /सदनिका उपलब्ध करून देऊन त्यांचे राहणीमान व जीवनमान उंचावणे व शहर झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी एक प्रभावी अभियान ही काळाची गरज आहे.
झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत खंडेवस्ती, भोसरी येथील सुमारे ३ हजार नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पांतर्गत ९२४ सदनिकांची निर्मिती होणार आहे. लाभार्थी कुटुंबाचे सर्व्हेक्षणही अंतिम टप्प्यात आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अर्थात एसआरएच्या नियमावलीनुसार, लाभार्थी नागरिकांना ४२० चौरस फुटाचे घर देण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे, या प्रकल्पासाठी परिसरातील खंडेवस्ती पुनर्वसन विकास समिती, ओमशक्ती प्रतिष्ठान, मस्जीद सिद्धीकी अकबर ट्रस्ट, धम्मचक्र मित्र मंडळ, खंडेवस्ती गणेश मंडळ, धम्मचक्र महिला मंडळ, बी. बी. फातिमा महिला बचत गट अशा संस्था, संघटनांनी एकोप्याने पुढाकार घेतला आहे.
Tags: खंडेवस्तीझोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणनागरिकांसाठी दिलासालाभार्थींकडून प्रकल्पाचे स्वागतसदनिकांची निर्मिती





















Join Our Whatsapp Group