पिंपरी (Pclive7.com):- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल ताशा पथकाला सराव करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेची जागा मोफत उपलब्ध करून द्यावी, अशा मागणीचे निवेदन माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी आयुक्त राजेश पाटील यांना दिले आहे.
शत्रुघ्न काटे यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गणेशोत्सवच्या काळात गणपती बाप्पाच्या अगमनापूर्वी एक महिना आधिच पिंपरी चिंचवड शहरातील ढोल ताशाची पथके बाप्पाचे आगमन तसेच विसर्जन मिरवणुकीसाठी जय्यत सराव सुरू करतात. त्याकरिता त्यांना सराव करण्यासाठी महापालिकेमार्फत जागा उपलब्ध करून दिली जाते. त्या मोबदल्यात महापालिका त्या पथकाकडून एक ठराविक अशी रक्कम भाडे स्वरूपात आकारत असते.
या पारंपरिक, शिस्तबद्ध आणि रुबाबदार ढोलपथकांमुळे पारंपरिक पध्दतीने मिरवणुक काढत श्रीगणेशाचे थाटात आगमन आणि विसर्जन पार पाडते. तरुणांची मोठी फौज या ढोल ताशाच्या पथकात दिसते. अभ्यास, कार्यालय सांभाळून ही मंडळी ढोल ताशाचा सराव करतात. काही महिने आधीपासूनच पथके या सरावाला सुरुवात करतात. अशा सामाजिक उपक्रमात सहभाग घेणाऱ्या व आपल्या संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या या ढोल ताशा पथकांना महापालिकेमार्फत एक सामाजिक बांधिलकी म्हणून शत्रुघ्न काटे यांनी पुढाकार घेतला आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक ढोल ताशे पथकाला सराव करण्यासाठी महापालिकेच्या मालकीची जागा उपलब्ध करून देण्यात आलेल्या जागेवर कुठल्याही प्रकारची भाडे आकारणी करण्यात येऊ नये . सदर जागा ढोल ताशे पथकांना सराव करण्यासाठी मोफत उपलब्ध करून या एक सामाजिक उपक्रमात हातभार लावता येईल अश्या मागणी निवेदन शत्रुघ्न काटे यांनी दिले आहे.