अंदाजपत्रकातील विविध कामाच्या निविदा काढण्याची नाना काटे यांची आयुक्तांकडे मागणी
पिंपरी (Pclive7.com):- शहरातील झपाट्याने विकसित होत असलेल्या रहाटणी – पिंपळे सौदागर प्रभागात अपूर्ण कामांमुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या प्रभागातील दुरूस्तींच्या कामांसह नवीन विकासकामांना तरतुदी अभावी ब्रेक लागला आहे. अंदाजपत्रकातील विविध कामाकरिता निविदा काढण्यात याव्यात अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे. काटे यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे निवेदनाव्दारे ही मागणी केली आहे.

नाना काटे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सन २०२१-२२ च्या सुधारित व सन २०२२-२३ च्या मूळ अंदाजपत्रकातील प्रभाग क्र.२८ रहाटणी – पिंपळे सौदागर येथील आवश्यक असलेली विकासकामे व देखभाल दुरुस्तीची कामे, तरतुदी अभावी निविदा प्रसिद्धी करू शकत नाहीत. त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीस सामोरे जावे लागत आहे. तसेच प्रभागातील विकासकामे होण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.

यामधील प्रमुख कामे खालील प्रमाणे..
१) रहाटणी येथील एसएनबीपी शाळेसमोरील डीपी रस्ता, शिवार चौक ते गोविंद गार्डन पर्यंत अद्यावत पद्धतीने काँक्रीटीकरण करणे.
२) मुलांना वाहतूक नियमांच्या माहितीसाठी चिल्ड्रेन्स ट्राफिक पार्क तयार करणे.
३) आरक्षण क्र.३६७ अ व ३६२ खेळाच्या मैदानाचे स्थापत्य विषयक कामे करणे.
४) मनपा शाळा व स्मशान भूमी येथील सिमाभिंत बांधून स्थापत्य विषयक कामे करणे.
५) भिसे पार्क, शिवराजनगर काटेवस्ती व विविध कॉलनी मध्ये व रस्त्यावर पेव्हिंग ब्लॉक बसविणे.
६) मनपा शाळा सीमाभिंतीलगत शिवसृष्टी उभारणे व सुशोभीकरण करणे.
७) विविध भागातील खडी मुरुमाचे रस्ते व एमपीएम पद्धतीने तसेच हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करणे, खड्डे, ट्रेंचेस, क्रॉसकट बुजविणे, थर्माप्लास्ट पट्टे मारणे, बेंचेस पुरवणे, नामफलक बसविणे, झाडे लावून चौक सुशोभित करणे व इतर स्थापत्यविषयक कामे करणे, आदी कामे करण्यासाठी सन २०२२-२३ च्या अंदाजपत्रकातील कामाच्या तरतुदी करण्याची मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी निवेदनात केलेली आहे.
Tags: आयुक्त राजेश पाटीलतरतूददुरुस्तीची कामेनाना काटेनिविदा प्रसिद्धपिंपरी चिंचवड महापालिकामाजी विरोधी पक्षनेतारहाटणी - पिंपळे सौदागरविकासकामांना ब्रेक