पिंपरी (Pclive7.com):- पर्यटक, शहरवासीय तसेच युवक युवतींचे खास आकर्षण, आवडीचे ठिकाण असलेल्या पुनावळे-रावेतला जोडणाऱ्या पवना नदीवरील श्री संत तुकाराम महाराज पुलाच्या (बास्केट ब्रिज) सौंदर्यास बाधा आली आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी झालेला जोरदार पाऊस व महापालिका प्रशासनाचे देखभाल दुरुस्तीकडे असलेले दुर्लक्ष, यामुळे पुलावरील आकर्षक आणि महाकाय लोखंडी आकृतीने अनेक ठिकाणी गंज पकडला आहे. पुलाच्या नावातील अक्षरे गळून पडली असून, येथील आकर्षक विद्युत रोषणाईची जागा काळोखाने घेतली आहे. त्यामुळे या पुलाची वेळोवेळी देखभाल दुरुस्ती होणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे.

पुनावळे आणि रावेत या दोन गावांमधून वाहणाऱ्या पवना नदीवर या गावांना जोडण्यासाठी हा पूल साकारण्यात आला आहे. या पुलावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली होती. पुलाखालून संथ वाहणारी पवना माई, पुलावर असलेली वाहनांची अन् नागरिकांची रेलचेल, थोडी उसंत मिळावी व मोकळी हवा घेण्यासाठी फेरफटका मारत आलेले पर्यटक आणि रहिवासी या ठिकाणी वेळ घालवणे पसंत करतात. त्यामुळे इथे दररोज मोठी गर्दी पाहायला मिळते. गप्पांचे फड रंगतात पुलावर करण्यात आलेल्या आकर्षक व रंगीत अशा विद्युत रोषणाईच्या दिव्यांचे प्रतिबिंब पवनेच्या पाण्यात उमटते. हे मनोहारी दृष्य पाहण्यासाठी गर्दी होते. अनेकजण आपल्या मोबाईलमध्ये हे चित्र टिपतात. मात्र, काही दिवसांपासून हे दिवे बंद पडलेत. लोकार्पणाची कोनशिला देखील गायब असून केवळ चौथरा शिल्लक आहे. नावातील अनेक अक्षरे वारंवार गळून पडतात. हा सर्व विषय महापालिकेने गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे.
या पुलाला हँगिंग ब्रिज, लंडन ब्रिज, बास्केट ब्रिज, लव्ह पॉइंट, रावेत पूल आशा नावांनी संबोधले जाते. अखेर महापालिका प्रशासनाने या पुलाला श्री संत तुकाराम महाराज पूल असे नामकरण केले असले तरीही इतर नावांनीच प्रचलित आहे.
जनतेच्या पैशांतून कोट्यवधी रुपये खर्चून हा पूल बांधण्यात आला. या पुलाची धाटणी अन् यावरील सजावट यामुळे पूल सर्वांच्या पसंतीस उतरला. मात्र, महापालिकेच्या अनास्थेमुळे या पुलाचे सौंदर्य कुरूप होत आहे. असेच दुर्लक्ष झाले तर हा पूल एकेदिवशी कोसळून जाईल.
– सागर एकनाथ शिंदे
युवासेना – युवा उपअधिकारी, चिंचवड विधानसभा.






















Join Our Whatsapp Group