पिंपरी (प्रतिनिधी):- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे मुंबईतील आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून घाटकोपर परिसरातील चिरागनगरात लोकशाहिरांचे वास्तव्य असलेल्या ठिकाणी हे स्मारक उभारण्यात येणार आहे. या समितीत पिंपरीतील सामाजिक कार्यकर्ते अमित गोरखे यांचा समावेश करण्यात आला आहे.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक उभारण्याची मागणी विविध स्तरातून शासनाकडे केली होती. या पार्श्वभूमीवर स्मारक उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीत स्मारक उभारण्याच्या कामास गती देण्याचा निर्णय घेण्यात आला.
सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीत उपाध्यक्ष व सदस्य सचिव म्हणून मधुकरराव कांबळे त्याचबरोबर सदस्य म्हणून आमदार श्रीकांत देशपांडे, संजय कुटे, सुधाकर भालेराव, राम कदम आणि सामाजिक कार्यकर्ते अमित गोरखे यांच्यासह विविध शासकीय संस्थांच्या प्रतिनिधींचा त्यात समावेश आहे.