देहू (प्रतिनिधी):- कंपनीत अल्पोपाहारासोबत चहा न दिल्याची तक्रार वरिष्ठांकडे केली, अन् त्यांच्याकडून झालेला अपमान सहन न झाल्याने देहूगावात एका युवकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार आज देहूगाव येथील गाथा मंदिर परिसरात उघडकीस आला.
सचिन मधुकर पवार (वय ३० रा. गायकवाड वस्ती, मोशी) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सचिन हा तळेगाव-चाकण येथील एका खासगी कंपनीत नोकरीला होता. शुक्रवारी कंपनीत अल्पोपाहारासोबत त्याला चहा दिला नाही. याची तक्रार त्याने सुपरवायझरकडे केली, मात्र सुपरवायझरने त्याचा अपमान केला.
कंपनीतून सुटल्यावर सचिन घरी न जाता देहूगावला गेला. गाथा मंदिराशेजारील एका चिंचेच्या झाडाला त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. कंपनीत अल्पोपाहारासोबत चहा न देऊन अपमान केल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे सचिन याने चिठ्ठीत लिहून ठेवले आहे.
सचिन याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरी पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात नेण्यात आला आहे. देहूरोड पोलीस पुढील तपास करत आहेत.
























Join Our Whatsapp Group