पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी तीन सदस्य प्रभाग रचना व त्यानुसार मतदार यादी आरक्षण अंतिम झालेले असताना शिंदे-फडणवीस सरकारने मात्र या सर्व प्रक्रियेला धक्का लावलेला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी २०१७ प्रमाणे चार सदस्यांची प्रभाग रचना अंतिम करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच लोकसंख्येनुसार नगरसेवकांची संख्या बदलून १३९ ऐवजी १२८ होणार आहे.

राज्य सरकारच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुंबई महापालिकेसह इतर महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. या निर्णयामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेत सध्याच्या १३९ सदस्यांऐवजी १२८ सदस्य संख्या होईल.
महाविकास आघाडीने चार ऐवजी तीन सदस्यांचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार पिंपरी चिंचवडमध्ये ४६ प्रभाग आणि १३९ नगरसेवकांची संख्या निश्चित करण्यात आली. त्यानुसार प्रभाग रचना करून त्यावर हरकती सूचना घेऊन अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. तसेच प्रभाग निहाय मतदार याद्यांची फोड देखील करण्यात आलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणावरील स्थगिती उठवल्याने या ४६ प्रभागातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि महिलांचे आरक्षण देखील निश्चित झालेले आहे.
या आरक्षणाची अधिसूचना लवकरच जाहीर होणार होती. त्यामुळे एका अर्थाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीची तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे. असे असताना आज शिंदे-फडणवीस सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार सदस्यांचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला, तसाच ही प्रभाग रचना २०१७ प्रमाणे असेल असेही त्यात निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत सगळ्या झालेल्या प्रक्रियाच रद्द करण्याची वेळ व नामुष्की ओढवलेली आहे.
मुंबई तसेच इतर महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा; सरकारने घेतलाय हा निर्णय
मुंबई महानगरपालिका तसेच अन्य महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
या निर्णयामुळे मुंबई महापालिकेत सध्याच्या २३६ सदस्यांऐवजी २२७ सदस्य संख्या होईल. तसेच इतर महानगरपालिकांमध्ये त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सदस्य संख्येत सुधारणा होणार आहे ती खालील प्रमाणे :-
३ लाखांपेक्षा अधिक व ६ लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांनी किमान संख्या ६५ इतकी तर कमाल संख्या ८५ इतकी असेल. ३ लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक १५ हजार लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त पालिका सदस्याची तरतूद करण्यात येईल. ६ लाखांपेक्षा अधिक व १२ लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांनी किमान संख्या ८५ इतकी तर कमाल संख्या ११५ इतकी असेल. ६ लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक २० हजार लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त पालिका सदस्याची तरतूद करण्यात येईल. १२ लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक ४० हजार लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त पालिका सदस्याची तरतूद करण्यात येईल. २४ लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक ५० हजार लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त पालिका सदस्याची तरतूद करण्यात येईल.
३० लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक १ लाख लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त पालिका सदस्याची तरतूद करण्यात येईल. १२ लाखांपेक्षा अधिक व २४ लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांनी किमान संख्या ११५ इतकी तर कमाल संख्या १५१ इतकी असेल. २४ लाखांपेक्षा अधिक व ३० लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांनी किमान संख्या १५१ इतकी तर कमाल संख्या १६१ इतकी असेल. ३० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांनी किमान संख्या १६१ इतकी तर कमाल संख्या १७५ इतकी असेल.
























Join Our Whatsapp Group