सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करण्याची नगरसेवक विनोद नढे यांची मागणी
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी अनेक कॅमेरे सध्या बंद अवस्थेत असल्याचा गंभीर मुद्दा समोर आला आहे. यासंदर्भात माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक विनोद जयवंत नढे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन दिले आहे. शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करण्याची मागणी विनोद नढे यांनी केली आहे.

शहरात महापालिका व स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र, सध्या अनेक कॅमेरे कार्यरत नसल्याने गुन्हे तपासात अडथळे निर्माण होत असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, असे त्यांनी नमूद केले आहे.

नगरसेवक विनोद नढे यांनी खालील मुद्द्यांवर माहिती मागवली आहे:
शहरात एकूण किती सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत आणि किती बंद आहेत?
बंद कॅमेरे दुरुस्त करण्यासाठी प्रशासनाने कोणती पावले उचलली आहेत?
कॅमेऱ्यांच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी कोणत्या ठेकेदाराकडे आहे? संबंधित कंपनीचे नाव काय?
या प्रकल्पासाठी किती निधी खर्च करण्यात आला असून किती रकमेचे वर्क ऑर्डर देण्यात आले आहेत?
ठेकेदाराला आतापर्यंत किती देयके अदा करण्यात आली? त्याचे बिल तपशील काय?
करारातील अटींनुसार देखभाल न झाल्यास कोणती दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे?
“सीसीटीव्ही यंत्रणा बंद राहणे म्हणजे शहराची सुरक्षितता धोक्यात आहे. याबाबत तातडीने उपाययोजना करून सर्व कॅमेरे कार्यरत करावेत,” अशी मागणी विनोद नढे यांनी केली आहे. दरम्यान, या निवेदनानंतर महापालिका प्रशासनाकडून नेमकी काय भूमिका घेतली जाते आणि बंद कॅमेरे पुन्हा कार्यरत करण्यासाठी कोणती पावले उचलली जातात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.



















Join Our Whatsapp Group